शहापूर तालुक्यातील महाविद्यालयात २२४४ विध्यार्थ्यांचे लसीकरण
खर्डी, ता. ५ (बातमीदार)ः १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण करण्यासाठी शहापूर तालुक्यात पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत २,२४४ विध्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वासिंद, शेंद्रुण, अस्नोली, सोगाव, पिवळी, सरळांबे, कसारा, डोळखांब, किन्हवली, टेंभा, अघई, शेणवा व टाकीपठार येथील महाविद्यालयांतील २,२४४ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. टेंभा प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या खर्डी येथील जीवनदीप महाविद्यालयात २०० व खर्डी ज्युनियर महाविद्यालयात ३०० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. चारुलता धानके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मोहिनी भिसे, डॉ. अश्विनी कांबळे, योगीता देशमुख, मनोहर जाधव, अविनाश भेरे व हिरामण संगारे यांनी लसीकरण मोहीम राबवली.
---
‘‘तालुक्यातील पालकांनी पुढाकार घेऊन १५ ते १८ वयोगटातील मुलांना जवळच्या महाविद्यालयात किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. कोरोनाला रोखण्यासाठी त्रिसूत्री नियमांचे पालन करा.’’ नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर.
---
उल्हासनगरातही १५०० विद्यार्थ्यांचे लसीकरण
राज्य शासनाच्या आदेशानुसार उल्हासनगरातील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. रोजच्या सहा शाळा निवडल्या जात असून त्यात सरासरी १५०० विद्यार्थ्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे, डॉ. अनिता सपकाळे यांनी दिली आहे. ३ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम महापौर लीलाबाई आशान यांच्या उपस्थितीत कॅम्प नंबर ४ मधील गुरुनानक शाळेत सुरू करण्यात आली. या वेळी पालिकेचे सहायक आयुक्त महेंद्र पंजाब, काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे, महापौरांचे स्वीय सहायक अंकुश कदम उपस्थित होते.