ठाण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा,
ठाणे, ता. ५ ः मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोना रुग्णांचा आलेख वाढता राहिला आहे. पण, रुग्णांच्या मृत्यूची संख्या आटोक्यात आहे. एखाद्या इमारतीत ओमिक्रॉनचा एक रुग्ण जरी आढळून आला अथवा कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या एका इमारतीत जास्तीची आढळल्यास इमारती सील करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत दिल्या. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या गेल्या.
ठाणे महापलिका क्षेत्रातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याबरोबर इतर उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी पालिका प्रशासनाने बैठक घेतली. मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्या दृष्टीने आता महापालिकेने पावले उचलली आहेत. तसेच,कन्टेनमेंट झोनची यादी तयार करुन त्यानुसार त्या त्या भागात कडक निर्बंध लावण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरीकाची माहिती, त्याचा इतिहास, याची माहिती घेऊन त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय मागील काही दिवसांपासून कोरोना चाचणी संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, चाचणीची संख्या आणखी वाढविण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच लसीकरण मोहिम युध्द पातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत.
--------------
उल्हासनगरात केनियातून आलेले तिघे ओमिक्रॉनबाधित
केनियातून उल्हासनगरात परतलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा रिपोर्ट ओमिक्रोन पॉझिटिव्ह आला आहे. त्यात पतिपत्नी आणि लहान मुलांचा समावेश आहे. त्यांना त्यांच्या घरात विलगीकरणात ठेवण्यात आले असून उद्या (गुरुवार) त्यांना रुग्णालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पगारे यांनी दिली.
१७ डिसेंबर रोजी ४ जणांचे हे कुटुंब केनियातून आले होते. त्यांचे आर्टिपीसीआर करून स्वॅब घेऊन पुण्याला पाठवण्यात आले होते.या कुटुंबातीलपतीपत्नी आणि मुलाचा अहवाल ओमिक्रोन पॉझिटिव्ह आला असून एक जण निगेटिव्ह आला आहे असे डॉ.पगारे यांनी सांगितले.
…....................................
चौकट
महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख ४६ हजार ७७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील १ लाख ४० हजार ६७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २ हजार १०९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ९९४ एवढी आहे.
…..............................
कोट :-
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना सूचना देण्यात आल्या असून त्याचे पालन करण्यासही सांगण्यात आले आहे.
- संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठामपा.