उपचारासाठी गर्भवतीचे हाल
तीन सार्वजनिक रुग्णालये फिरण्याची वेळ
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पालिकेच्या केईएम रुग्णालयात मंगळवारी (ता. ४) दाखल झालेल्या एका गर्भवतीची कोणतीही तपासणी न करताच तिला इतर रुग्णालयांत पाठवण्याचा हलगर्जीपणा रुग्णालयातील स्त्री-रोगतज्ज्ञ आणि मेडिसीन विभागातील डॉक्टरांनी केल्याचे समोर आले आहे. ही महिला ९ महिन्यांची गर्भवती असतानाही तिच्या उपचारांमध्ये अक्षम्य हेळसांड करण्यात आली. एकीकडे कोविडची तिसरी लाट उंबरठ्यावर आलेली असताना प्रसूतीसाठी या गर्भवतीला तीन सार्वजनिक रुग्णालये फिरावे लागली. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनीदेखील या बातमीला दुजोरा दिला असून अशा प्रकारे रुग्णाची गैरसोय होऊ नये यासाठी ट्रान्सफर प्रोटोकॉल पाळलेच पाहिजे, असे आदेश रुग्णालयांना दिले आहेत.
मंगळवारी सकाळी नऊ महिन्यांची गर्भवती असलेली महिला केईएम रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिला श्वास घेण्याचा त्रास होत होता, तसेच तापही आला होता. त्यामुळे केईएम रुग्णालयातील स्त्री-रोग विभागाच्या डॉक्टरांनी तिची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी तिला रुग्णालयातीलच मेडिसीन विभागात पाठवले; मात्र मेडिसीन विभागातही तिची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे गर्भवतीला तिच्या कुटुंबीयांनी जेजे रुग्णालयात नेले; मात्र तिथेही दाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी गर्भवतीला नायर रुग्णालयात नेले. नायर रुग्णालयात ही महिला दुपारी पोहोचल्यावर तेथील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेत तिची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात तिचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यानंतर या महिलेला पुन्हा केईएम रुग्णालयात रात्री उशिरा पाठवण्यात आले. उपचारामध्ये विलंब झाल्याने महिलेच्या प्रसूतीचा कालावधी जवळ आला होता. वेळेत उपचार आणि दाखल करून घेतले गेले नसते तर महिलेची प्रसूती अर्ध्यातच झाली असती, अशी भीतीदेखील नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या वैद्यकीय संचालकांनी आता रुग्णांना इतर रुग्णालयात ट्रान्सफर करताना कोविड प्रोटोकॉल आणि ट्रान्सफर प्रोटोकॉल पाळण्याचे सक्त आदेश रदिले आहेत. तसेच, या सर्व प्रकाराविषयी केईएम रुग्णालयातील स्त्री-रोग विभागाच्या प्रमुखांना अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेमुळे सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये संवादाचा अभाव असल्याचेही पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
कोट
रुग्णालयातील डॉक्टरांनी एखादा रुग्ण ट्रान्सफर करायचा असल्यास आरटीपीसीआर व कोविड प्रोटोकाॅलसह इतर सर्व प्रोटोकाॅल पाळलेच पाहिजेत. तसेच, संबंधित रुग्णालय प्रशासनाशीही आधी संवाद साधावा. जेणेकरून रुग्णाची गैरसोय होणार नाही. गर्भवतीला झालेल्या त्रासाविषयी संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- डॉ. रमेश भारमल, प्रमुख, पालिका रुग्णालये आणि अधिष्ठाता, नायर रुग्णालय.
कोट
गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या नव्हत्या. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. स्त्री-रोग विभागातून तिला मेडिसीन विभागात आरटीपीसीआर करण्यास पाठवले होते. तेथे आरटीपीसीआर का झाले नाही, याविषयी माहिती नाही.
- डॉ. निरंजन मायदेव, स्त्री-रोगतज्ज्ञ, विभागप्रमुख, केईएम रुग्णालय.