कोविड काळात बैठक न घेतल्याने गृहनिर्माण सोसायटी बरखास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड काळात बैठक न घेतल्याने गृहनिर्माण सोसायटी बरखास्त
कोविड काळात बैठक न घेतल्याने गृहनिर्माण सोसायटी बरखास्त

कोविड काळात बैठक न घेतल्याने गृहनिर्माण सोसायटी बरखास्त

sakal_logo
By
कोविड काळात वार्षिक बैठक न घेतल्याने गृहनिर्माण सोसायटी बरखास्त सहनिबंधक केदारी जाधव यांची कारवाई; पदाधिकाऱ्यांची सहकार मंत्र्यांकडे धाव सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ५ : कोविड काळात गर्दी टाळण्यासाठी वार्षिक बैठका, स्नेहसंमेलने न घेण्याचे राज्य सरकारने केलेले आवाहन नेरूळमधील एका गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या अंगलट आले आहे. २०१९ आणि २०२० या वर्षात आलेल्या कोविडसारख्या वैश्विक महामारीमुळे वार्षिक सभा आयोजित न केल्याचा ठपका ठेवत सहनिबंधक डॉ. केदारी जाधव यांनी गृहनिर्माण सहकार संस्थेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली आहे. चूक नसतानाही कार्यकारिणी बरखास्त केल्याने पदाधिकाऱ्यांना नाईलाजास्तव सहकार मंत्र्यांकडे दाद मागावी लागणार आहे. गेली दोन वर्षे जगभरात कोविडसारख्या महामारीने थैमान घातले आहे. हा आजार गर्दीमुळे अधिक पसरत असल्याने केंद्र व राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी सभा, स्नेहसंमेलने, सार्वजनिक कार्यक्रमांतील गर्दींवर निर्बंध आणले आहेत. २०१९ आणि २०२० हे कोविडच्या पहिल्या दोन लाटांचे वर्ष असल्याने सहकार विभागातर्फे बैठकांना मनाई करण्यात आली होती; परंतु वार्षिक लेखाजोखा मांडण्यासाठी मार्गदर्शक नियमावलीत सुस्पष्टता नसल्याने हजारो गृहनिर्माण सहकारी संस्थांनी वार्षिक बैठक घेतली नाही. याबाबत एका सदस्याने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने केदारी जाधव यांनी सुनावणी घेत थेट संस्थेविरोधात निर्णय देऊन संपूर्ण सोसायटीची कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. ऐन कोविड काळात कार्यकारिणी बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केल्याने सोसायटीतील रहीवाशांना समस्येच्या खाईत लोटले आहे. याबाबत सहनिबंधक डॉ. केदारी जाधव यांच्याशी संपर्क केला असता, आपण काढलेल्या ऑर्डरची फाईल कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून तयार केली जाते. त्यामुळे ती फाईल वाचल्यानंतर माहिती देता येईल, असे सांगितले. --------------------------------------- कारभारावर प्रश्नचिन्ह २०१७-१८ आणि २०१८-१९ या कालावधीत नेरूळ येथील अजिंक्यतारा गृहनिर्माण सहकारी संस्थेचा लेखाजोखा तत्कालीन अध्यक्षांनी सादर केलेला नाही. त्याबाबत अनेकदा सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी सहनिबंधक डॉ. केदारी जाधव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावर सहनिबंधक कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत थेट २०१९ आणि २०२० वर्षातील सभांचा उल्लेख सहनिबंधक कार्यालयाकडून केला जात असल्याने सोसायटीतील पदाधिकाऱ्यांकडून सहनिबंधक कार्यालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. हिशेब सादर न केलेल्या वर्षातील कारभार लपवण्यासाठी दुसऱ्या वर्षातील सभा न घेतल्याचा मुद्दा पुढे केला जात असल्याचे सोसायटीतर्फे अध्यक्ष पांडुरंग नलावडे, उपाध्यक्ष लिओ पिन्टो आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ---------------------------------------- जेव्हा आम्ही सहनिबंधक डॉ. केदारी जाधव यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला सहनिबंधकांनी दिलेल्या निर्णयावर सहकार मंत्र्यांकडे अपिलात जाण्याचा सल्ला दिला; परंतु कोविड काळात गृहनिर्माण सहकार संघटनांनी वार्षिक बैठका घ्यायच्या कशा, याबाबत नियमावली दिलेली नाही. तसेच ऑनलाईन बैठका घेण्याबाबत सहकार विभागाची मार्गदर्शक नियमावलीत स्पष्टता नसल्याने बैठका घेण्यास अडचणी येत होत्या. तसेच सरकारकडून वारंवार दर आठवड्याला निर्बंधांमध्ये बदल होत असताना आमच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक आहे. - आर. डी. भोसले, अजिंक्यतारा गृहनिर्माण सहकारी संघटना, सचिव.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top