रोजच्या २५ हजार रुग्णांसाठी
महापालिका यंत्रणा सज्ज
डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचीही पुन्हा कंत्राटी पद्धतीने भरती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : कोविडचा संसर्ग वाढू लागला असून रोजच्या रोज बाधितांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ होत आहे. अंदाजानुसार जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तिसऱ्या लाटेचा उच्चांक असेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने आता रोज २५ हजार रुग्ण आल्यावर कोणत्या पद्धतीचे व्यवस्थापन लागेल, याचा अंदाज घेऊन तयारी करून ठेवली आहे. गरज पडल्यास तात्काळ व्यवस्थापनाची व्याप्ती वाढवण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून महापालिकेने डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांचीही पुन्हा कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत रोज २५ हजार बाधित आढळल्यास सध्याच्या परिस्थितीनुसार त्यातील १० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागू शकते. त्यासाठी ३५ हजार बेड लागतील. तशी तयारी महापालिकेने केली आहे. ‘कोविडच्या वाढत्या रुग्णांचा अंदाज घेऊन योग्य व्यवस्था करण्यात येत आहे. गरजेनुसार त्यात वाढही करता येऊ शकते,’ असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोविड संसर्गाचा उच्चांक असू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे; मात्र तशी परिस्थिती जानेवारीच्या मध्यावरच येऊ शकते, अशी शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने त्या दृष्टीने नियोजन करून ठेवले आहे. काकाणी यांनी मंगळवारी मुंबईतील जम्बो कोविड केंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
---
बॉक्स
सध्या तरी बेड वाढवण्याची घाई नाही
कोरोना रुग्ण वाढत असले, तरी रुग्णालयातील उपचारांची गरज कमी रुग्णांना पडत आहे. त्यामुळे सध्या फक्त १२ टक्के बेड व्यापलेले आहेत. त्यामुळे आता बेड वाढवण्याची घाई करण्यात येणार नाही. बेड ५० टक्क्यांच्या आसपास व्यापू लागल्यास त्यांची क्षमता वाढवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
----
प्राणवायूची तिप्पट क्षमता
मुंबईतील रुग्णांना लागणाऱ्या प्राणवायूच्या गरजेच्या तिप्पट क्षमता महापालिकेने तयार करून ठेवली आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार बाधितांपैकी दोन टक्के रुग्णांना कृत्रिम वायूची गरज लागत आहे. त्यानुसार येत्या काळातील गरजेपेक्षा तिप्पट साठवणक्षमता पालिकेने केली आहे.
---
सध्याची परिस्थिती
- पाच टक्के बाधितांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज
- पाचव्या दिवशी रुग्ण ठणठणीत बरे
------
नियोजन काय?
- दहा टक्के रुग्णांना दाखल करण्याच्या दृष्टीने नियोजन
- सात किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ रुग्णालयात ठेवता येईल