सेल्फ टेस्टची विक्री जोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेल्फ टेस्टची विक्री जोमात
सेल्फ टेस्टची विक्री जोमात

सेल्फ टेस्टची विक्री जोमात

sakal_logo
By
सेल्फ टेस्टच्या विक्रीचा जोर चिंताजनक! घरच्या घरी कोरोना चाचणीमुळे संसर्ग लपवाछपवीची भीती सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ५ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घरीच केल्या जाणाऱ्या अँटीजेन चाचणी किटच्या मागणीत झालेली तीव्र वाढ आरोग्य विभागासाठी चिंतेचे कारण बनले आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशा अनेक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत नसेल. कारण पॉझिटिव्ह व्यक्ती संबंधित एजन्सींना त्याची माहिती देत नाहीत. घरीच चाचणी केलेल्यांपैकी किती जण पॉझिटिव्ह आले याचा आकडाही हजारोंच्या वर असेल, असेही सांगितले जात आहे. मुंबईत हजारो कोविड सेल्फ टेस्टचे अहवाल असे आहेत, ज्यांची नोंद झालेली नाही. असे अहवाल पालिकेला मिळत नसल्याने रुग्णांचा नेमका आकडा समजत नाही. सध्या मुंबईसह राज्यात होम कोविड अँटीजेन चाचणी किट्सची विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येतील लपवाछपवी आणि त्यातून त्यांना शोधणे एक प्रकारचे आव्हान आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार फक्त डिसेंबरमध्येच १८ हजार (१७,८४१) सेल्फ किट चाचणीचे निकाल त्यांना मिळाले आहेत. त्यातील ३९० नागरिक पॉझिटिव्ह सापडले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी दर २.१९ टक्के एवढा होता. सध्या बाजारात कोविसेल्फ बाय मायलॅब, कोविफाईंड बाय मेरिल आणि पॅनबिओ बाय अॅबॉट असे तीन प्रकारचे सेल्फ चाचणी किट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. औषधांच्या दुकानदारांनीही कोविड सेल्फ-टेस्ट किट त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या उत्पादनांपैकी एक असल्याचे सांगितले. डिसेंबरअखेरपासून रुग्ण वाढू लागल्यानंतर पुन्हा एकदा अशा किट्सची मागणी वाढली आहे. एका किटची किंमत २५० रुपयांपासून सुरू होते. शिवाय त्याचा अहवालही बरोबर असल्याचे केमिस्टकडून सांगण्यात आले. आम्ही दिवसभरात २५० ते ३५० सेल्फ किट विकतो. अहवाल पॉझिटिव्ह आला आणि पालिकेला त्याबाबत कळवले तर चांगलेच आहे. चार दिवसांपासून सर्दीचे रुग्ण वाढल्याने किटची विक्री जास्त होत आहे, असे कळवा येथील बी. एम. चौधरी केमिस्टचे मॅनेजर प्रवीण रावल यांनी सांगितले. .... अहवाल कळवायला हवा १. सेल्फ टेस्ट किट स्व-रिपोर्टिंगवर अवलंबून असतात. त्याचा अहवाल अधिकाऱ्यांना कळावा, अशी यंत्रणा नसते. सर्व निर्मात्यांनी एक अॅप तयार केले आहे, जेथे वापरकर्त्यांनी आपले अहवाल अपलोड करायचे आहेत; परंतु असे करणे अनेक जण टाळत आहेत. २. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की नागरिक आता जागरुक झाले आहेत. ते स्वतःच चाचण्या करतात आणि उपचार घेतात. होम क्वारंटाईन होतात. दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठीही याचा फायदा होतो. किट सहज उपलब्ध असल्यामुळे घरीच चाचणी केली जाते. ३. मुंबईपाठोपाठ दिल्ली आणि कोलकाता किटचे सर्वांत मोठे खरेदीदार आहेत. कोव्हिसेल्फ कोरोनासह ओमिक्रॉनचा संसर्गही शोधू शकते, असेही सांगण्यात आले आहे. ........ कोट बाधित आपला अहवाल लपवत असतील, तर त्यांना शोधून काढू. आयसीएमआरच्या नियमानुसार अशा चाचणीचे अहवाल अपलोड व्हायला हवेत, पण काही जण कंपनीच्या अॅपवर अहवाल देत नाहीत. अशांना शोधणे गरजेचे आहे. - डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये कोव्हिसेल्फ टेस्ट किटच्या विक्रीत २०० टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक मागणी आहे. - हसमुख रावल, संस्थापक-एमडी, मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स