नवी मुंबईत काँग्रेस एकटीच लढणार ?

नवी मुंबईत काँग्रेस एकटीच लढणार ?

नवी मुंबईत काँग्रेस ‘एकटीच’ लढणार ? नाना पटोलेंकडून नेत्यांची कानउघाडणी सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ५ : नवी मुंबई महापालिकेबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची कानउघाडणी केल्याचे समजते. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचा पुनरुच्चार पटोले यांनी बैठकीत केला. तसेच महाविकास आघाडीबाबत जे काही ठरवायचे आहे, ते प्रदेशपातळीवरून ठरवले जाईल, अशा शब्दांत ज्येष्ठ नेत्यांना फटकारले. टिळक भवन येथील काँग्रेसच्या कार्यालयात नवी मुंबई काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदस्य नोंदणी, बूथ व प्रभाग पातळीवर कार्यकर्त्यांची मोर्चेंबांधणी आणि निवडणुकीबाबत नियोजन या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच पटोले यांनी उपस्थित नेते व कार्यकर्त्यांचे निवडणुकीबाबत मत जाणून घेतले. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर पक्षाला काय फायदा होईल, याबाबत स्थानिक ज्येष्ठ नेत्यांकडून प्रदेशाध्यक्षांना महत्त्व पटवून दिले; परंतु स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पटोले यांनी नेत्यांच्या कारकिर्दीत पक्षाच्या झालेल्या वाताहतीचा पाढा वाचला. गेली कित्येक वर्षे नवी मुंबईत रसातळाला गेलेल्या काँग्रेस पक्षाचा हिशेब मांडला. नवी मुंबईतील नेत्यांनी बूथ पातळीवरील मोर्चेबांधणी व सदस्य नोंदणी न केलेल्या कामांबाबत पटोले यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. तुम्हाला मोर्चेबांधणी करता येत नसेल तर आम्ही दुसरी फळी तयार करू, अशा शब्दांत सज्जड दमवजा सूचना पटोले यांनी दिल्या. गेल्या महिन्यात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सानपाडा येथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत केलेल्या बैठकीचे पडसाद टिळक भवन येथील बैठकीत उमटल्याचे समजते. नवी मुंबईसह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय प्रदेश पातळीवरून घेतला असतानाही नवी मुंबईत स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांकडून आघाडीबाबत केलेल्या चर्चेवरून पटोले यांनी केलेली आगपाखड कार्यकर्त्यांमध्ये चर्चचा विषय बनली आहे. महापालिकेत १२२ जागा असताना काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या २० ते २२ जागांचा फॉर्म्युला कसा निश्चित करता, काँग्रेसची ताकद कशी वाढणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी बेलापूर आणि ऐरोली अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघांत दोन नव्या कार्याध्यक्षांची निवड केली जाणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले. तसेच जबाबदारी पार पाडता येत नसेल तर बाजूला व्हा, मी त्या ठिकाणी काँग्रेसच्या तरुण वर्गाला संधी देतो, असे ज्येष्ठ नेत्यांना ठणकावले. महाविकास आघाडीबाबत प्रदेश काँग्रेसने निर्णय घेतला असताना नवी मुंबईतील स्थानिक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा का करता. वारंवार सांगूनही बैठका घेऊन प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिल्यास थेट कारवाई करण्याचा इशाराही पटोले यांनी दिला. जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी, माजी उपमहापौर रमांकात म्हात्रे, अविनाश लाड, महिला अध्यक्षा पूनम पाटील, प्रदेश सरचिटणीस रामचंद्र दळवी, प्रदेश सचिव आनंद सिंग, प्रमोद मोरे, सुधीर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. --------------------------------- तळी उपसणाऱ्यांचे काय? नवी मुंबईत सध्या काँग्रेसचे मोजकेच कार्यकर्ते विविध विकासकामे आणि प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर आहेत. उर्वरित कार्यकर्ते महापालिकेत स्वतःच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांना पायघड्या घालत असतात. स्वतःच्या प्रभागात लक्ष न देता प्रदेश पातळीवरील नेत्यांची कानभरणी करण्याचे काम करतात. अशा लोकांमुळे काँग्रेस नवी मुंबईत पिछाडीवर पडल्याची चर्चा बैठकीदरम्यान रंगली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com