एक कोटी नागरिकांना लशीचा पहिला डोस
मुंबईत आता १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : लसीकरण मोहिमेत मुंबईने पुन्हा एकदा अव्वल कामगिरी केली आहे. एक कोटीहून अधिक नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा मुंबईने बुधवारी (ता. ५) पार केला. तसेच, मुंबईत आजवर १ कोटी ८१ लाखांहून अधिक नागरिकांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एकूण दोन कोटी लशींचा टप्पा गाठण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरू आहे.
दरम्यान, मुंबई महानगरात १५ ते १८ वर्ष वयोगटातील सुमारे ९ लाख २२ हजार मुलांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचे आता लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ३ जानेवारीपासून या वयोगटाचे लसीकरण सुरू झाले असून आतापर्यंत सुमारे १५ हजार ११० मुला-मुलींनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.
मुंबईत वेगाने लसीकरण करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या गेल्या. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरू करण्यात आले. त्याचबरोबर स्तनदा माता, विदेशात शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी जाणारे नागरिक, शारीरिक व मानसिकरित्या दुर्बल व्यक्ती, गर्भवती, तसेच शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठीदेखील विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली. याशिवाय वैद्यकीय कारणांनी अथवा वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्यांचे घरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. यासोबतच आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, तृतीयपंथी आदींसाठी विशेष लसीकरण केंद्र उघडण्यात आले. महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि १८ वर्षांवरील विद्यार्थी यांच्यासाठी तसेच फक्त दुसरा डोससाठी राखीव सत्र, अशा निरनिराळ्या उपाययोजना महापालिकेने केल्या आहेत.
.......
लसीकरणाची विक्रमी कामगिरी
दिनांक पहिला डोस
३१ मे २०२१ २५ लाख
१९ जुलै २०२१ ५० लाख
१५ सप्टेंबर २०२१ ७५ लाख
५ जानेवारी २०२२ १ कोटी
........
दिनांक दोन्ही डोस
५ मे २०२१ २५लाख
२६ जून २०२१ ५० लाख
७ ऑगस्ट २०२१ ७५ लाख
४ सप्टेंबर २०२१ १ कोटी
२८ सप्टेंबर २०२१ १.२५ कोटी
१० नोव्हेंबर २०२१ १.५० कोटी
५ जानेवारी २०२२ १.८१ कोटी