मुंबईत विक्रमी रुग्णवाढ
१५,१६६ नवे रुग्ण; चाचणी केलेला प्रत्येक चौथा व्यक्ती पाॅझिटिव्ह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईत कोरोना संसर्गाने उग्र रूप धारण केले आहे. आज ६०,०१४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील तब्बल १५,१६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच चाचणी केलेला प्रत्येक चौथा व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळत आहे. त्यामुळे मुंबईतील पॉझिटिव्हीटी दर २५ टक्क्यांच्यावर गेला असून कोरोनाच्या पाहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील हा सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
एकमेव दिलासा म्हणजे नवीन रुग्णांपैकी ८७ टक्के म्हणजेच १३,१९५ रुग्ण लक्षणेविरहीत आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नसून घरीच विलगीकरणात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ८.३ टक्के रुग्णांना म्हणजे १२१८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईत सध्या ६१,९२३ सक्रिय रुग्ण आहेत. आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी ८० रुग्णांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के आहे. आज ७१४ रुग्ण कोरोनातून बरे झाले; तर रुग्ण दुपटीचा दरही ८९ दिवसांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत सध्या २० कंटेन्मेंट झोन असून सक्रिय सीलबंद इमारतींचीही संख्याही ४६२ पर्यंत वाढली आहे.