मानखुर्दच्या मतिमंद बालगृहात कोरोनाचा शिरकाव
तीन मुलींना लागण; चेंबूरच्या वाशीनाका केंद्रात उपचार
मानखुर्द, ता. ६ (बातमीदार) : मानखुर्दच्या मतिमंद बालगृहात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. बुधवारी (ता. ५) सकाळी बालगृहातील २६० गतिमंद मुलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तीन मुलींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच नवीन बालगृहातील एका मुलीलादेखील संसर्ग झाला आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चिल्ड्रेन्स ॲड सोसायटीच्या मानखुर्द येथील मतिमंद बालगृहात कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. विशेष म्हणजे या बालगृहातील मुलांना वैद्यकीय उपचारासाठी गोवंडीच्या शताब्दी तसेच शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले जाते. त्याव्यतिरिक्त त्यांना बाहेर कुठेही नेण्यात येत नाही. त्यामुळे रुग्णालयातूनच या मुलांना कोरोना संसर्ग झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पहिल्या लाटेत कोरोनाने बालगृहात प्रवेश केला होता. मुलांसह संस्थेच्या डॉक्टरांना देखील त्यावेळी संसर्ग झाला होता. बुधवारी केलेल्या तपासणीमध्ये बालगृहातील ३ मुलींना संसर्ग झाल्याचे समोर आले. या तीन मुलींसह नवीन बालगृहातील एक मुलगी बाधित झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना चेंबूरच्या वाशीनाका येथील केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नवीन बालगृहाच्या अधीक्षकांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.