ज्ञान मिळविण्यासाठी अभ्यास करा
कॅप्टन डॉ. मिलिंद भगत यांचा सल्ला
पोलादपूर, ता. ६ (बातमीदार) : विद्यार्थ्यांनी अभ्यास फक्त गुण मिळवण्यासाठी करू नये, त्याचा वापर प्रत्यक्षात ज्ञान मिळविण्यासाठी करावा. मोठी स्वप्ने पाहतानाच त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी, असा सल्ला लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे अधिव्याख्याता कॅप्टन डॉ. मिलिंद भगत यांनी दिला. ते लोहारे येथील साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते.
अजूनही मुलांमध्ये डॉक्टर अथवा इंजिनिअर्स बनण्याचे वेड असते. त्याचप्रमाणे त्यांनी आयएएस, आयपीएस अधिकारी बनून देशसेवेला समर्पित करावे. सध्या रोजगाराच्या संधी बदलत असून पारंपरिक नोकरीपेक्षा रोजगार देणारे शिक्षण आवश्यक आहे. मुलांना आपल्यातील कौशल्य विकासाच्या वाढीवर प्रयत्न करावेत, असे त्यांनी या वेळी बोलताना म्हटले. या वेळी व्यासपीठावर पोलादपूर पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, दत्तात्रेय काटाळे, सुरेंद्र जाधव, मुख्याध्यापक सुगंधा वाडवळ, रंजना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक किसन सुरवसे, आदेश साळवी, रविकांत सकपाळ, नारायण चोरगे व शिक्षकेतर कर्मचारी धनराज गोपाळ, गिरिधर दरेकर, उद्योग क्षेत्रातील पोलादपूर येथील रहिवासी मुंबईस्थित उद्योजक विकास गोपाळ यांचाही गौरव करण्यात आला. तालुक्यातून माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेजमधून प्रथम क्रमांक पटकावून नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.