मारहाणप्रकरणी
मनसे पदाधिकाऱ्याविरोधात
अदखलपात्र गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ ः अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मनसे तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्याविरोधात रमेश देवरुखकर यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या वादातून गजानन पाटील, बांधकाम भागीदार डी. के. सिंग यांच्यासह तीन ते चार जणांनी देवरुखकर यांना जबर मारहाण केल्याची तक्रार त्यांची मेहुणी माधुरी गाडे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. दाखल तक्रारीनुसार या चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश देवरुखकर हे निळजे गाव येथे राहणारे असून त्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पाटील यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. बुधवारी, ५ जानेवारीला रात्री देवरुखकर यांच्यावर निळजे रेल्वेस्थानकाजवळ हल्ला झाला असून ते बेशुद्ध पडले असल्याची माहिती तेथील एका व्यक्तीने देवरुखकर यांच्या पत्नीस दिली. त्यांनी तत्काळ बहीण माधुरी गाडे यांना ही माहिती फोनद्वारे दिली. देवरुखकर यांची पत्नी व गाडे दाम्पत्याने निळजे रेल्वेस्थानक परिसरात धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील देवरुखकर यांना उपचारासाठी देसाई गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात त्यांच्या जबड्यास व डोक्यास जबर जखमी झाली आहे. हा हल्ला गजानन पाटील, डी. के. सिंह व त्यांच्या साथीदारांनी केल्याचा संशय असून, त्यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.