अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांनंतर ताब्यात
प्रेम प्रकरणातून घर सोडून पळाली; कौशल्यपूर्ण तपास
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) ः मुलुंडच्या नवघर भागातील प्रेम प्रकरणातून पळून गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा नवघर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून दोन महिन्यांनंतर तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. त्यामुळे नागरिकासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही उपनिरीक्षक महेश लामखडे यांच्यासह त्याच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.
मुलुंड पूर्वेकडील नवघर पोलिस ठाण्यात गेल्या ८ ऑक्टोबरला पालकांनी आपली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता असून, तिचे कोणीतरी अपहरण केले असावे, या संशयावरून तक्रार दाखल केली होती. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही अपहृत मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तिचा तपास नवघर पोलिस ठाण्यातील मिसिंग पथकाकडे सोपवला. दरम्यान, हे प्रकरण गंभीर असल्याने गुन्हे शाखादेखील समांतर पद्धतीने तिचा शोध घेत होते.
ही मुलगी बेपत्ता होऊन जवळपास दोन महिने उलटले होते, तरीही पोलिसांना सापडत नव्हती. अनेक नागरिकांकडे चौकशी करूनही सकारात्मक माहिती मिळत नव्हती. त्यामुळे अखेर बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने फौजदार महेश लामखडे यांच्यासह पथकातील पोलिस नाईक खैरनार हे करू लागले. त्यांनी प्रकरणाचा सूक्ष्म अभ्यास केला. गुप्त बातमीदारामार्फत माहिती संकलित करून, तिचे विश्लेषण केले. त्यानंतर लामखडे यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर ठाण्यातील कासार वडवली, घोडबंदर परिसरातून मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. तिला सुरक्षेस्तव डोंगरी बालगृहात ठेवण्यात आले होते. ही मुलगी घरातून प्रेम प्रकरणातून निघून गेल्याचे समोर आले. पोलिस नाईक राजेंद्र खैरनार आणि महिला पोलिस सोनाली मोरे यांचा तपास पथकात समावेश होता.
...