सिंधुताई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
पुरस्कार सुरू करावा
रामदास आठवले यांची राज्य सरकारकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : अनाथांच्या माता पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्र नव्हे तर देशाचे नुकसान झाले आहे. सिंधुताई सपकाळ या स्त्री-शक्तीच्या प्रतीक होत्या. त्यांचे जीवन हे संघर्षमय राहिले आहे. मूर्तिमंत ममत्व आणि संघर्षातून फुललेले कर्तृत्व यामुळे सिंधुताई या महिलांच्या आदर्श ठरल्या आहेत. त्यामुळे सिंधुताई सपकाळ यांचे राज्य शासनाने स्मारक बांधावे, तसेच त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार सुरू करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड दुःख सहन केले. अनाथ मुलांचा ममतेने सांभाळ करून त्यांनी अनेकांना घडवले. निराधार स्त्री म्हणून त्यांनी स्वतःला कमकुवत समजले नाही; तर त्यांनी हिमतीने अनेकांना आधार दिला. निराधारांना आधार देणाऱ्या त्या आधारस्तंभ झाल्या. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने सिंधुताईंचा गौरव पद्मश्री पुरस्काराने केला आहे. राज्य सरकारनेही त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिला सक्षमीकरण क्षेत्रात पुरस्कार सुरू केल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.