महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
सुगरण स्पर्धेतील बक्षीस वाटप
नवी मुंबई, ता. ६ ः सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मातृमिलन हॉल येथे समता महिला मंडळाने अपोलो रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. उपस्थित सर्व महिलांची इसीजी, रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी आदी आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील व कार्याध्यक्ष प्रा. वर्षा भोसले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर पुण्यातील बार्टीच्या प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनीही कार्यक्रमाला भेट दिली. मंडळाच्या अध्यक्ष फुलन शिंदे यांनी महिलांना सावित्रीबाई फुले व फुले वाडा याबद्दल विषयी माहिती दिली. मंडळाच्या सचिव रेखा तांबेवाघ, सदस्य वनिता पाटील, गीता वैती, सुवर्णा कोकाटे, सविता बोऱ्हाडे, बेलका राठोड, श्रद्धा धुमाळ, ममता किटुकले, मिनल पवार, प्रीती जाधव आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमात सकाळ सुगरण स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धक या वेळी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. ‘सकाळ’कडून महिलांसाठी दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवले जातात. यामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळत असून ज्ञानात भर पडत असल्याची प्रतिक्रिया विजेत्या महिलांनी दिली. कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन केले होते.