ठाण्यात बैठ्या चाळीतील ४५० कुटुंब टॉवरमध्ये

ठाण्यात बैठ्या चाळीतील ४५० कुटुंब टॉवरमध्ये

ठाण्यात बैठ्या चाळीतील ४५० कुटुंबे टॉवरमध्ये दोन तपांनंतर स्वप्नपूर्ती; नववर्षाची सुरुवात गोड सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ६ ः पाचपाखाडीतील चाळीत १० बाय १० च्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या सुमारे ४५० कुटुंबांचे टोलेजंग इमारतीमध्ये राहण्याचे स्वप्न अखेर दोन तपांनंतर पूर्ण होणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत ही घरे या कुटुंबांना मिळाली आहेत. दोन दिवसांपूर्वीच या कुटुंबांना विकासक आणि एसआरए प्राधिकरणाच्या उपस्थितीत घरांच्या चाव्या मिळाल्याने नवर्षाची सुरुवात मकर संक्रांतीआधीच त्यांच्यासाठी गोड झाली आहे. ठाणे पालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस अनेक चाळी होत्या. छोट्या घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या या चाळकऱ्यांना शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी १९९७ मध्ये इमारतीत पक्क्या घराचे स्वप्न दाखवले होते. त्यामुळे या प्रस्तावित योजनेचे नाव ‘आनंद सावली’ ठेवत जुळवाजुळव सुरू झाली, पण २००१ मध्ये दिघे यांचे अपघाती निधन झाले आणि हा प्रस्ताव सात वर्षे रखडला. अखेर २००८ मध्ये सोसायटीने जयेंद्र गाला या विकासकाची नियुक्ती केली. २०११ मध्ये या ४५० कुटुंबांचे स्थलांतर करून त्यांच्या चाळी पाडण्यात आल्या. दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार होता, पण अनेक अडचणी निर्माण झाल्या. विकासक जयेंद्र गाला यांचेही आकस्मिक निधन झाले. त्यामुळे विस्थापित चाळकरी आणखी हवालदिल झाले, पण गाला कुटुंबीयांनी आपली जबाबदारी झटकली नाही. त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करत विक्रमी वेळेत २४ मजल्यांचे दोन टॉवर उभे केले. त्यामुळे १० बाय १० च्या खोलीतून चाळकरी टॉवरच्या प्रशस्त घरांमध्ये स्थिरावले आहेत. पाच वर्षांतील पहिला पूर्ण प्रकल्प ठाण्यासाठी पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत साकार झालेला हा पहिला प्रकल्प आहे. त्यामुळे एसआरएच्या माहिती पुस्तिकेच्या दर्शनी भागात या प्रकल्पाला सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे. दर्जेदार घरे एसआरए योजनेतील इमारती दुय्यम दर्जाच्या असतात असाच आतापर्यंतचा अनुभव आहे; मात्र गाला ग्रुपने ही परंपरा मोडत उत्तम दर्जाची सुसज्ज इमारत उभारली आहे. प्रत्येक घरात पुरेसा प्रकाश येईल याची खबरदारी घेत मुबलक पार्किंग, सोलार वॉटर अशा सुविधाही दिल्याची माहिती लाभार्थी रहिवासी मनोज सिनलकर, किसन शिंदे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com