दोन ऑइल टँकरच्या अपघातात चालकांचा मृत्यू
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात लेनवर घडली घटना
नालासोपारा, ता. ६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन ऑइल टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही टँकरचालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. विरार हद्दीत शिरसाड फाटा येथे आज (ता. ६) दुपारी ३.३० वाजता गुजरात लेनवर ही घटना घडली आहे. विरार-मांडवी परिक्षेत्राच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला.
अशोककुमार अमरजित पाल (वय ४८), शिवधारी हारकू यादव (वय ४८) अशी अपघातात मृत्यू झालेल्या टँकरचालकांची नावे आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशचे राहणारे असून कामानिमित्त महाराष्ट्रात वास्तव्यास होते. शिवधारी यादव या चालकाचा टँकर खराब झाल्याने त्याने टँकर रस्त्यालगत लावला होता. टायरला दगड लावण्यासाठी तो खाली उतरला होता. याच वेळेस अशोककुमार यादव हा चालक आपला टँकर भरधाव वेगात गुजरात लेनवरून घेऊन जात होता. त्या वेळी त्याचे नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या टँकरवर तो जाऊन आदळला. या अपघातात टँकरच्या केबिनचा चक्काचूर झाला. यात दोन्ही टँकरचालकांचा जागीच मृत्यू झाला.
टँकर अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख, पोलिस निरीक्षक प्रफुल वाघ यांच्यासह पोलिस हवालदार युवराज जाधव, पोलिस नाईक हनुमंत डोईफोडे, कॉन्स्टेबल रामदास घुगे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन टँकर बाजूला केला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याबाबत विरार पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.