वाढत्या कोरोनामुळे पालघरमधील शाळा बंद
पालघर, ता. ५ ः पालघर जिल्ह्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील निवडक क्षेत्रांतील १ ते ५ वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. यात वसई-विरार महापालिकेसह पालघर, डहाणू व वाडा येथील ग्रामपंचायत हद्दीतील शाळांचा समावेश आहे.
कोविड- १९ विषाणूच्या संसर्ग व प्रादुर्भावामुळे राज्यात रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच या आठवड्यात संपूर्ण पालघर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांवर पोहचला आहे. लहान मुलांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये व त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, म्हणून जिल्ह्यातील वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील पालघर व डहाणू नगर परिषद हद्दीतील, पालघर तालुक्यातील बोईसर, सरावली, खैरापाडा, कुंभवली, पाम, सालवड, पास्थळ, बेटेगाव, नवापूर, कोलवडे व मान ग्रामपंचायत हद्दीतील तसेच वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील सर्व माध्यमांच्या १ ली ते ५ वी पर्यंतच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.