घटस्फोटित पतीने केले पत्नीचे न्यूड व्हिडीओ व्हायरल
बदनामी करण्यासाठी कृत्य केल्याचे उघड; पोलिसांकडून शोध सुरू
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : उरण भागातील पंकज नामक व्यक्तीने आपल्या घटस्फोटित पत्नीचे न्यूड व्हिडीओ इंटरनेटवरील वेगवेगळ्या साईटवरून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे व्हिडीओ उरण परिसरात तसेच पीडित तरुणी रहात असलेल्या गावात व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पीडित तरुणी व तिच्या कुटुंबीयांची समाजामध्ये बदनामी होऊ लागल्याने पीडित तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. उरण पोलिसांनी या घटेनीतील आरोपी पंकज विरोधात आयटी ॲक्टसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
पीडित तरुणी व तिचा घटस्फोटित पती पंकज हे दोघेही उरण परिसरातील रहिवासी आहेत. २०१३ मध्ये या दोघांची फेसबुकच्या माध्यमातून ओ़ळख झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यात मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन वर्षांच्या प्रेम संबंधांनंतर कुटुंबीयांच्या सहमतीने या दोघांचे लग्न जमले. दोघेही फोनवरून संपर्कात होते. याच कालावधीत पंकजने पीडित तरुणीला मोबाईलवर न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवायला सांगितले होते. पंकजसोबत काही दिवसांतच लग्न होणार असल्याने पीडित तरुणीने त्यावेळी आपल्या मोबाईलवरून व्हिडीओ तयार करून पंकजच्या मोबाईलवर पाठवून दिले होते.
२०१६ मध्ये पीडित तरुणीचे पंकजसोबत लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासरी राहाण्यास गेली. सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेल्यानंतर पंकज व त्याच्या कुटुंबीयांनी पीडित तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पंकज आणि पीडित तरुणी या दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे पीडित तरुणी व पंकज या दोघांनी जून २०२१ मध्ये पनवेल न्यायालयातून घटस्फोट घेतला. त्यानंतर पीडित तरुणी आपल्या वडिलांच्या घरी राहाण्यासाठी गेली. पंकजने पीडित तरुणीची बदनामी करण्यासाठी तिचे व्हिडीओ इंटरनेटवरील वेगवेगळ्या साईटवर अपलोड केले. व्हिडीओ वेगवेगळ्या साईटवर व्हायरल होऊन ते उरण परिसरात पीडित तरुणीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले.
व्हिडीओ पीडित तरुणीने पाहिले असता ते व्हिडीओ तिने पंकजला लग्नापूर्वी पाठविलेल्या व्हिडीओपैकी असल्याचे आढळून आले. तसेच पीडित तरुणीने लग्नानंतर सासरी काढलेले काही सेल्फी फोटो सुद्धा व्हिडीओसोबत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. घटस्फोटित पती पंकज यानेच बदनामी करण्यासाठी व्हिडीओ इंटरनेटवरील वेगवेगळ्या साईटद्वारे व्हायरल केल्याचे पीडित तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने उरण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.