भिवंडीत कोट्यवधी रुपयांचा बनावट कापड साठा जप्त
भिवंडी, ता. ६ (बातमीदार) ः भिवंडी शहर परिसरात नामांकित कंपनीचे लेबल लावून कपडे विक्री करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. भिवंडी तालुक्यातील अंजूरफाटा भागातील एका गोदामात ‘सियाराम’ या सुप्रसिद्ध कपड्याच्या ब्रँडचे लोगो वापरून बनावट कपडे विक्री करण्यासाठी साठवलेले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आपल्या विशेष पथकासह छापा मारून कॉपीराईट कायद्यांतर्गत कारवाई केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला आहे.
भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील अंजुरफाटा येथील धारणी आर्केड या ठिकाणी चौधरी टेक्सटाईल्स नावाने गोदाम आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणावर सियाराम या सुप्रसिद्ध कापड उत्पादक कंपनीच्या लेनीन या ब्रँडचे कपडे साठवल्याची माहिती इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन अँटीपायरसी सेलचे रामजित गुप्ता यांनी नारपोली पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांना सांगितली. बल्लाळ यांनी पोलिस पथकासह सकाळी गोदामावर छापा मारला. त्या ठिकाणी बनावट कपड्याच्या किनारीवर सियाराम लेनिन असे ब्रँडनेम लिहिलेले २६५ रुपये मीटरप्रमाणे विकले जाणारे एक कोटी एक लाख १७ हजार ४३५ रुपयांचे ३८ हजार १७९ मीटर कापड आढळून आले. हे कापड जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी गोदाम चालक जमाल अहमद कमरुद्दीन खान व गुरुचरण सतनाम सिंग या दोघांविरोधात फसवणूक व कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक बल्लाळ करीत आहेत.