लोअर परळ वर्कशॉपमधील
६२ रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना
बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील ६२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली रेल्वे कर्मचारी काम करत आहेत.
पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांत बायोमेट्रिक हजेरी बंद असतानाही लोअर परळ वर्कशॉपमध्ये अशा पद्धतीने हजेरी सुरू होती. रेल्वे कर्मचारी, रेल्वे संघटनेच्याद्वारे बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचे निवेदन वारंवार पाठविण्यात आले होते. वर्कशॉपमध्ये चार वेळा बायोमेट्रिक हजेरी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांना वारंवार रांग लावावी लागते. कोरोना वाढत्या प्रादुर्भावाने गोरखपूर, दिल्ली येथील रेल्वे विभागाने बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. मात्र, लोअर परळ, महालक्ष्मी, माटुंगा या वर्कशॉपमध्ये अशी हजेरी सुरूच असल्याने रेल्वे कर्मचारी नाराजी व्यक्त करतात.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णालयात सुमारे ३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली.