हमालीसाठी पैसे मागितल्यास
वाहतूकदारांवर गुन्हे दाखल करा
कामगार आयुक्तांचे आदेश; अंतिम निर्णय प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : वाहतूकदारांनी वाहनचालक-मालकांकडून हमालीचे पैसे घेऊ नये, अशी मागणी कामगार आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे लोडिंग-अनलोडिंग, वाराई आणि मराईची रक्कम वाहनचालक व मालक यांच्याकडून वसूल करण्याचा आग्रह कोणी करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तात्पुरत्या सूचना मुंबईतील कामगार आयुक्तालयाने दिल्या आहेत; मात्र अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नसल्याचे कामगार आयुक्त रमेश जाधव यांनी सांगितले.
माल भरताना आणि उतरवताना वाहतूकदारांनी हमालीचे पैसे द्यायचे, असा पारंपरिक निर्णय आहे; मात्र मोटार मालक कामगार वाहतूक संघटनांकडून ज्यांचा माल त्यांनीच हमालीचे पैसे देण्याची मागणी केली आहे. त्यावर सध्या कामगार आयुक्त कार्यालयाने तात्पुरता निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या तरी वाहतूकदारांना हमालीचे पैसे देण्याची गरज नाही. ते पैशांचा आग्रह करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याने वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील सर्व वाहतूकदार संघटनेचे अथक प्रयत्न फळाला आले आहेत. वाहतूकदारांना हमालीमुक्त करण्यासाठी कामगार आयुक्तांकडून निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा, तालुका पातळीवरील २०१६ च्या परिपत्रकानुसार अंमलबजावणी करण्यात यावी व त्याचा अहवाल कामगार आयुक्तांना पाठवण्यात यावा, असे आदेश असल्याने वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे, असे राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले.
---
वाहतूकदारांची कामगार विभागाकडे मागणी केली होती. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
- रमेश जाधव, कामगार आयुक्त