आॅनलाईन खरेदीत ४ लाखांची फसवणूक
स्वस्त कॅमेरा, घड्याळ मिळवणे पडले महागात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.६ ः मुंबईच्या कफ परेड भागात राहणाऱ्या केतन तांडेल या डेस्कटॉप इंजिनीयरला फेसबुकवरील जाहिरात पाहून एक कॅमेरा आणि घड्याळ आॅनलाईन खरेदी करणे चांगलेच महागात पडले. या दोन वस्तू खरेदी करण्याच्या नादात केतन यांना एका व्यक्तीने चार लाख ४३ हजारांना गंडा घातला.
केतन यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर असलेल्या सॅम्युअल मार्क नावाच्या प्रोफाईलवर एक गो प्रो कॅमेरा आणि वन प्लस कंपनीच्या एका घड्याळाची जाहिरात पाहिली. त्यांची किंमत मार्केटपेक्षा कमी म्हणजेच कॅमेराची २५ हजार, तर घड्याळाची नऊ हजार इतकी होती. दोन्ही वस्तू आवडल्याने केतन यांनी संपर्क साधला. नंतर सॅम्युअल मार्क नावाच्या माणसाने केतनला व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. केतन यांनी दोन्ही वस्तू बुक केल्या. त्यानंतर सॅम्युअल नावाच्या व्यक्तीने वेगवेगळी कारणे सांगत दोन महिन्यांत चार लाख ४३ हजार रुपये वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर ट्रान्सफर करून घेतले. एवढे पैसे घेऊनही केतन यांना एकही वस्तू मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंविच्या कलम ४१९, ४२० आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
...