कोस्टल रोडचा तिढा कायम
बैठक निष्फळ; आदित्य ठाकरेंनी प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : नरिमन पॉइंट ते वरळीपर्यंतच्या सागरी किनारी मार्गातील मासेमारी मार्गाचा तिढा आजही सुटलेला नाही. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीतही त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. आता आदित्य ठाकरे यांनी मच्छीमार समाजाबरोबर प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोस्टल रोड वरळी सागरी सेतूला जोडला जाणार आहे. त्या ठिकाणच्या दोन पिलरमधील अंतर २०० मीटर ठेवण्याची वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांची मागणी आहे; मात्र महापालिका प्रशासनाने ते अंतर ६० मीटर प्रस्तावित केले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी जाण्याचा मार्ग बंद होणार असल्याचा दावा करत कोळी समाजाने तीव्र आंदोलन छेडले आहे. काही भागांतील कामावरही परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांनी दृक्श्राव्य माध्यमातून पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांच्या उपस्थीतीत कोळी समाजाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली.
बैठकीत कोळी समाजाने पिलरमधील अंतर २०० मीटर ठेवण्याची मागणी केली. वादग्रस्त भाग सोडून इतर भागांतील बांधकाम अडवू नये, अशी भूमिका पालिका आयुक्तांकडून मांडण्यात आली. त्यावर कोळी समाजाने आक्षेप घेतला आहे. बांधकाम सुरू झाले तर नंतर आराखड्यात कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे काम सुरू करण्यावर आक्षेप घेण्यात आला.
अखेरीस बैठक कोणत्याही निर्णयाशिवाय संपली असल्याचे समजते. आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष संयुक्त पाहणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
---
बॉक्स
हे तज्ज्ञांचे वैयक्तिक मत!
काही तज्ज्ञांनी पिलरमधील अंतर दोनशे मीटर असावे अशा मागणीचे समर्थन केले; मात्र त्यावर आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आक्षेप नोंदवला. हे त्या तज्ज्ञांचे वैयक्तिक मत असू शकेल, असे त्यांनी नमूद केले.