मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा
भाजपतर्फे जोरदार निषेध
मुंबईत निदर्शने, यज्ञ आणि मेणबत्ती मोर्चा
मुंबई, ता. ६ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याप्रकरणी भाजपतर्फे आज काँग्रेस पक्ष कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. ॲड. आशीष शेलार यांनी मोदींच्या दीर्घायुष्यासाठी मंदिरात महाअभिषेक केला.
मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींवरून आज दिवसभर भाजप व काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या. दुपारी भाजप कार्यकर्त्यांनी आमदार तमिळ सेल्वन यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयावर मोर्चा काढला. काँग्रेसने देशाची माफी मागावी, काँग्रेसने लाज बाळगावी, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. हे सर्व षड्यंत्र काँग्रेसनेच रचले असूनही काँग्रेस नेते आनंदोत्सव साजरा करीत आहेत. असा पक्ष सामान्य जनतेचे काय हाल करील, याची कल्पना करावी, असा इशाराही या वेळी भाजप नेत्यांनी दिला.
मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी आमदार ॲड. आशीष शेलार यांनी वांद्रे येथील मंदिरात शंकराच्या पिंडीवर महाअभिषेक केला. या वेळी महामृत्युंजय मंत्राचा जपही करण्यात आला. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर जमून पंजाब सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याच्या निषेधार्थ शेलार यांच्या नेतृत्वाखाली वांद्र्यात संध्याकाळी मेणबत्ती मोर्चाही काढण्यात आला.