प्रमाणपत्रांची पडताळणी दुसऱ्या विभागाकडून करा
मराठी शाळा संस्थाचालक संघाची मागणी
मुंबई, ता. ७ : २०१३ नंतर राज्यातील विविध शाळांमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांच्या शिक्षक पात्रता प्रमाणपत्राची पडताळणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून केली जाणार आहे. यासाठी नुकतीच एक समिती गठित करण्यात आली असून त्याला मराठी शाळा संस्थाचालक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ज्या परिषदेकडून शिक्षक पात्रता प्रमाणपत्र देण्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला, त्यांच्याकडूनच या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यास त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यामुळे या प्रमाणपत्रांची पडताळणी ही इतर विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमणूक केली जावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
राज्यातील विविध शाळांवर १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याने अनेक शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांचे हे प्रमाणपत्र जलदगतीने म्हणजे ७ जानेवारी २०२२ पर्यंत तपासणीचे आदेश दिले असल्याने यात प्रचंड मोठ्या प्रमाणात अनागोंदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या समितीऐवजी हे प्रमाणपत्र इतर विभागाची समिती स्थापन करून त्याची पडताळणी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.