मुंडण आंदोलन करून कामगारांकडून कंपनी प्रशासनाचा निषेध
कोकाकोला कंपनीविरोधात सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच
वाडा, ता. ७ (बातमीदार) ः कोकाकोला कंपनी प्रशासन व ठेकेदार यांच्याविरोधात कामगारांनी बुधवारपासून (ता. ५) वाडा तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या झेंड्याखाली बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे; मात्र या आंदोलनाच्या मागण्या मान्य न केल्याने तिसऱ्या दिवशी सकाळी कामगारांनी मुंडण आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोकाकोला ही शीतपेय बनवणारी कंपनी असून या कंपनीत स्थानिक भूमिपुत्र कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. कंपनी प्रशासन व ठेकेदार यांचा मनमानी कारभार सुरू असून ठेकेदाराने कामगारांचे भविष्यनिर्वाह निधीचे पैसे भरलेले नाहीत. या व इतर मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे; मात्र दुसऱ्या दिवशीही कंपनी प्रशासन किंवा कामगार आयुक्त प्रशासन या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे कामगारांनी आंदोलनस्थळीच मुंडण करून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
आज दुपारी निवासी नायब तहसीलदार सुनील लहांगे यांनी कोकाकोला कंपनीचे व्यवस्थापक रूपेश परदेशी, संदीप वेखंडे, ठेकेदार धनंजय चौधरी, उपसहाय्यक आयुक्त दीपक बोडके, पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, संघटनेचे नेते जितेश पाटील, रवींद्र मेणे व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मागण्यांबाबत कामगारांत एकमत न झाल्याने बोलणी फिस्कटली. त्यामुळे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.