शिळ येथील देहर्जा नदीवरील सिमेंट काँक्रीटच्या बंधाऱ्याला गळती
१० महिन्यांपूर्वीच झाले बांधकाम; शेतकऱ्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी
अमोल सांबरे
विक्रमगड, ता.७ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील शिळ- देहर्जे गावाच्या हद्दीवरून वाहत असलेल्या देहर्जे नदीवर १० महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र कमी दर्जाच्या कामामुळे काही महिन्यांतच या बंधाऱ्याच्या आतील बाजू वाहून गेली. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी राहत नसल्याने हा बंधारा नदीतील शोभेची वास्तू म्हणून उभा राहिला आहे.
बंधारा बांधल्यानंतर पहिल्या पावसाच्या पुरातच या बंधाऱ्याच्या खालील बाजूस मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे बंधाऱ्याला मोठी गळती लागली आहे. तसेच, बंधाऱ्याच्या मधे अनेक ठिकाणी छिद्र पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. शासन पाण्याच्या साठ्यासाठी बंधाऱ्यावर प्रचंड खर्च करत आहे. विक्रमगड तालुक्यातील गावांसाठी, आजुबाजूच्या पाड्यांमधील शेतकरी तसेच गुरेढोरांना पाणी पिण्यासाठी हा बंधारा उपयोगी पडू शकतो. मात्र, बंधाऱ्याच्या कमी दर्जाच्या कामामुळे १० महिन्यांतच गळती लागली आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्त करून पाणी अडवण्याची मागणी येथील नागरिक व शेतकरी करत आहेत. याबाबत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपअभियंता आर. के. पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या बंधाऱ्याला गळती लागली असल्याची कुठलीही लेखी तक्रार दाखल नाही. मी या बंधाऱ्याची दोन दिवसांत पाहणी करतो.