ठाणे जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक नवे मतदार
जिल्ह्यातील मतदार संख्या ६४ लाख ६६ हजार ७९८
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ ः भारतीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या १ लाख ७० हजार ६९९ एवढी आहे. जिल्ह्यात आता एकूण मतदारांची संख्या ६४ लाख ६६ हजार ७९८ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०२२ पूर्वी व विशेष संक्षिप्त कार्यक्रमानंतर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ८४१ वरून ८४३ झाले आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी जिल्ह्यात एकूण मतदार ६४ लाख ६६ हजार ७९८ असून त्यात महिला मतदारांची संख्या २९ लाख ५७ हजार १४, तर पुरुष मतदारांची संख्या ३५ लाख ९ हजार ४२ आहे. इतर मतदारांची संख्या ७४२ आहे, असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले. मतदार नोंदणी कार्यक्रमात १ लाख ७० हजार ६९९ एवढ्या मतदारांची वाढ झाली असून त्यामध्ये महिला ८१ हजार ६७६, तर पुरुष ८८ हजार ७८४ आहेत व इतर मतदारांची संख्या २३९ आहे. १ जानेवारी २०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले ८ लाख ३५ हजार ५०८ इतके मतदार होते.
......................................
जिल्हा एडस् प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांच्याशी सलग्न असलेल्या तृतीयपंथी व वंचित घटकातील महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांची बैठक घेण्यात आली. त्याद्वारे वंचित घटकांतील मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भिवंडी, उल्हासनगर व कल्याण येथे शिबिरे आयोजित करण्यात आली. ठाणे जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ७४२ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी झाली आहे.