म्हाडाप्रश्नी सरकार कटिबद्ध ः उपमुख्यमंत्री
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे राज्य सरकारचे धोरण आहे. आज काढण्यात आलेली संगणकीय सोडत त्याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘सर्वांसाठी घरे’ हा कार्यक्रम राज्य सरकार प्राधान्याने राबविणार आहे. तसेच म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत उभारलेल्या ४,२२२ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज काढण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री मुंबई येथील देवगिरी शासकीय निवासस्थानातील कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा ही संस्था आशेचा किरण असून कोरोना काळातही विक्रमी संख्येने आलेले अर्ज हे त्याचेच प्रतीक आहे. या कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर व्हीसीद्वारे उपस्थित होते; तर पुण्यातील कार्यक्रमस्थळाच्या व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अधिकारी नितीन माने आदी उपस्थित होते.
...