निष्कारण भीती अन् निष्काळजीपणा नको
वाढत्या रुग्णसंख्येवर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नव्या बाधित होणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ८७ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. राज्यातील कोविडसाठी राखीव असलेल्या एकूण खाटांपैकी केवळ ३.८४ टक्के खाटांवर सध्या रुग्ण आहेत. ही बाब दिलासादायक असली तरी कोरोनाबाबत निष्कारण भीती आणि निष्काळजीपणाही नको, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
दुसऱ्या लाटेवेळी एवढी रुग्णसंख्या असताना तब्बल आठ हजार ५२७ रुग्ण ऑक्सिजन खाटांवर होते. सध्या मात्र ती संख्या दोन हजार ५६० म्हणजे एक तृतीयांश पेक्षा कमी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची तुलना केल्यास ४ मार्च २०२१ रोजी ८५ हजार १४४ सक्रिय रुग्णांची नोंद होती. आता ही संख्या लाखांच्या घरात गेली आहे. राज्यात ६ जानेवारीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार ८४७ पर्यंत पोहोचली.
मुंबईत ८७ टक्के, तर पुण्यात ८५ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता असून घाबरण्याचे कारण नाही. सध्या तशी स्थिती नसल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
---
सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे; परंतु ऑक्सिजनच्या बहुतांश खाटा रिक्त आहेत. लसीकरणामुळे रुग्णांना ऑक्सिजन खाटांची आवश्यकता कमी भासत असल्याचे चित्र आहे; परंतु कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
--