धारावीतील निराधार वृद्धाला अखेर आधार मिळाला
सविता सदाफुलेंच्या प्रयत्नांना यश
धारावी, ता. ८ (बातमीदार) : धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना एका गरीब निराधार आंधळ्यासोबत घडलेल्या घटनेने धारावीकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक शौचालयात खितपत पडलेल्या निराधार वृद्ध अंध गरिबाला आश्रमात सोडण्यासाठी दाहीदिशा एक करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या सविता सदाफुले यांची सध्या धारावीत चर्चा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून निराधार अंध धारावीतील शास्त्रीनगर परिसरातील एका सार्वजनिक शौचालयात वास्तव्य करत होता. कोणी काही खाण्यास दिले तर ते खाऊन नाहीतर उपाशीपोटी शौचालयात पडून होता. तो स्थानिक रहिवासी असूनसुद्धा येथील रहिवासी त्याच्याकडे कानाडोळा करत होते. यामुळे तो पार खचून गेला होता. शरीरात ताकद असेपर्यंत त्याने भिक मागून आपला उदरनिर्वाह कसाबसा चालविला. मात्र वयोमान वाढल्याने तो हतबल झाला. चालणेही अवघड होऊन बसल्याने त्याची उपासमार होऊ लागली, परिणामी त्याची प्रकृती आणखीनच खालावली. शौचालयाच्या कोपऱ्यात अखेरची घटका मोजत तो निपचित पडला होता.
सविता यांचे त्याच्याकडे लक्ष गेल्यावर त्यांनी वृद्धाबाबत माहिती घेतली. धारावीतील काही सामाजिक संस्थांकडे धाव घेतली, परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. मात्र मनाशी दृढ निश्चय केलेल्या सविता यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले.
...
‘अरुणोदय’कडून मदत
अलीकडे राजीव गांधीनगरमधील अरुणोदय फाऊंडेशनने मदतीचा हात दिला. नुकतेच या निराधार वृद्धाला फाऊंडेशन व धारावी पोलिसांच्या मदतीने त्याची कोरोना चाचणी करून कर्जत येथील ग्रेट फाऊंडेशन चिंबूर नावाच्या आश्रमात हलविण्यात आले. या घटनेमुळे समाजभान दाखविणाऱ्या सविता सदाफुले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
...