वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी सरकारी यंत्रणा एकवटल्या
अंबरनाथ, ता. ८ (बातमीदार ) ः अंबरनाथजवळील डोंगरातून उगम पावणाऱ्या आणि शिवमंदिराजवळून वाहणारी वालधुनी नदी रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. नदीचे प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका प्रशासन, एमआयडीसी अशा सरकारी यंत्रणांची बैठक नुकतीच नगरपालिकेमध्ये झाली. या बैठकीत प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली.
वालधुनी नदी अंबरनाथ एमआयडीसी आणि पुढे अंबरनाथ शहरातून उल्हासनगर शहरात वाहत जाते. मात्र, अंबरनाथ एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडले जाते; तर जीन्स वॉश कारखान्यांचे सांडपाणीही वालधुनी नदीत सोडले जाते. यामुळे गेल्या काही वर्षांत या नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. याच नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वनशक्ती संस्थेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने स्थानिक स्वराज्य संस्थांसह एमआयडीसीला दंड ठोठावला होता. यातून या नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार होते. वालधुनी नदीबाबत झालेल्या बैठकीला अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी शंकर वाघमारे, एमआयडीसीचे अधिकारी, अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कारवाईकडे लक्ष
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नदीत एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्यांकडून थेट रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नुकत्याच पालिकेत झालेल्या बैठकीनंतर या कंपन्यांवर काय कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.