आनंदीबाई सुर्वे उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात
२६ जानेवारीला लोकार्पण
अंधेरी, ता. ८ (वार्ताहर) ः मुंबई महापालिकेच्या वतीने चांदिवलीत सहा एकरवर उद्यान बनविण्यात येत आहे. उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून २६ जानेवारीला लोकार्पण करण्यात येणार आहे.
ही जागा १९६६ पासून पालिकेच्या ताब्यात आहे. या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकला होता; परंतु दोन वर्षांपूर्वी उद्यान विभागाला ही जागा उद्यान बनविण्यासाठी देण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी चार कोटी रुपये अंदाजित खर्च करण्यात आला आहे. भविष्यात अजूनही काम करण्यात येणार आहे.
आनंदीबाई सुर्वे उद्यानात जपानी शैलीनुसार विविध सेवासुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यात ३-४ किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॕक, पदपथ, हिरवळ, रंगबेरंगी फूलझाडांचा समावेश आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा विकसित केली आहे. बेबी फिडिंग रूम व शौचालय बांधण्यात आले आहे.
मियावकी पद्धतीने झाडे लावण्यात येणार आहेत. ही पद्धत जपानी असली तरी झाडे देशी प्रजातींची लावण्यात येणार आहेत.
भविष्यात या ठिकाणी टॉय ट्रेनसाठी प्रयत्न करणार असल्याचे गोविंद मगर (मुख्य कार्यकारी अभियंता, उद्यान कक्ष) यांनी सांगितले. विभागातील नागरिकांसाठी सुविधायुक्त आणि मोठे उद्यान असल्याने फायदा होईल. तसेच आणखी निधी आणून उद्यानाची शोभा वाढवण्यात येईल, असे नगरसेवक प्रकाश देवजी मोरे यांनी सांगितले.
...