इंडिया स्किल्स स्पर्धेत राज्यातील ७५ स्पर्धक सहभागी
मुंबई : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या (एमएसडीई) मार्गदर्शनांतर्गत कार्य करणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे (एनएसडीसी) इंडिया स्किल्स-२०२२ स्पर्धेला नवी दिल्लीत शुक्रवारपासून (ता. ७) सुरुवात झाली. तीन दिवसीय या स्पर्धेत २६ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमधील ५०० हून अधिक, तर महाराष्ट्रातून ७५ स्पर्धक सहभागी झाले आहेत. कार पेन्टिंग, पॅटिसरी व कन्फेक्शनरी, वेल्डिंग, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग, सायबर सुरक्षितता, फ्लोरिस्ट्री अशा ५० हून अधिक कौशल्यांचे या स्पर्धेत सादरीकरण करावे लागणार आहे.
७ ते ९ जानेवारी या कालावधीत तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा कोरोना नियमांचे पालन करून होत आहे. तत्पूर्वी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची कौशल्य स्पर्धा ३ ते ५ जानेवारी या कालावधीत बेंगळुरू व मुंबई येथे घेण्यात आल्या. सर्व कौशल्य स्पर्धेतील विजेत्यांना १० जानेवारीला नवी दिल्ली येथे गौरविण्यात येईल. या स्पर्धेतील विजेत्यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये शांघाय, चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. इंडिया स्किल्स स्पर्धा तरुणांना त्यांची आवड जोपासण्यासाठी साधन देते आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते. ही स्पर्धा जगाला भारताची क्षमता दाखवून देते, असे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल म्हणाले.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अतुलकुमार तिवारी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेद मणी तिवारी, ओडिशा कौशल्य विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व माइण्डट्रीचे सह-संस्थापक सुब्रोतो बागची आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. निर्मलजीत सिंग कलसी हे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.