वसईच्या ग्रामीण भागाला ‘आरोग्य सुरक्षा’
अद्ययावत रुग्णालयांची उभारणी होणार
- प्रसाद जोशी
नागरिकांना अधिकाधिक आरोग्य सेवा पुरविता याव्यात, यासाठी वसई-विरार महापालिका व जिल्हा आरोग्य प्रशासनाने नवीन योजना आखल्या आहेत. वसई, नवघर, आचोळे व खानिवडे या ठिकाणी लवकरच अद्ययावत रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य सुरक्षा कवच मिळणार आहे.
पालिका हद्दीतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाणे परवडत नाही. त्यामुळे हे रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात दाखल होतात. या ठिकाणी त्यांच्यावर मोफत उपचारदेखील केले जातात. याकरिता २ रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३ माताबाल संगोपन केंद्र कार्यरत आहेत. कोरोनाकाळात कोविड केंद्रासाठी पालिकेला खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. पालिका क्षेत्रात सर्वसुविधा संपन्न रुग्णालय व्हावे, याकरिता आचोळे येथील आरक्षण क्र. ४५५ व सर्वे क्र. ६ येथील दोन एकर जागेत २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १५ कोटी ८२ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. आमदार क्षितिज ठाकूर यांनी यासाठी पाठपुरावा करत आराखडादेखील तयार केला आहे; त्यात काही बदल करण्याचाही विचार सुरू आहे. माजी महापौर रूपेश जाधव यांनी पालिका व आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालिकेने कामाचा कार्यादेशदेखील काढला आहे.
वसईत औद्योगिक व नागरी अशी संमिश्र लोकवस्ती आहे. या ठिकाणी नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येणार आहे; तर महामार्गाला लागून असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य समस्यांसाठी अनेकदा शहराची वाट धरावी लागते किंवा मुंबई गाठावी लागते. त्यामुळे खानिवडे या ठिकाणी नव्याने ३० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारले जाणार आहे. या ठिकाणी उपलब्ध जागांपैकी काही जागा वनविभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांचे सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागेचा प्रश्न निकाली निघाल्यावर रुग्णालयाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० खाटांची क्षमता लक्षात घेऊन आराखडा तयार केला आहे व अंदाजपत्रक तयार करून आरोग्य विभागालादेखील सादर करण्यात आला आहे. तीन ठिकाणी एकूण ३३० खाटांची क्षमता असणारी रुग्णालये उभारण्यात येणार असल्याने शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा होणार असून, कमीत कमी खर्चात व वेळेत उपचार घेण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथील आरक्षित जागेवर २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आचोळे, वसई व महामार्गावरील रुग्णांना त्यामुळे सहज उपचार घेता येणे शक्य होणार आहे.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका
-------------------------------------------
रुग्णालये खाटा
आचोळे २००
वसई १००
खानिवडे ३०