छकडा एक्स्प्रेसचा टीझर पाहून अनुष्काला केले ट्रोल
बॉलीवूडची क्युट अभिनेत्री अनुष्का शर्मा बराच काळ पडद्यापासून लांब होती; मात्र आता अनुष्का एका वेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनुष्काने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘छकडा एक्स्प्रेस’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट टीमच्या माजी कर्णधार झुलन गोस्वामीवर आधारित आहे. अनुष्काने या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अनुष्काच्या हातात बॅट असून ती क्रिकेटच्या मैदानात आहे. यासोबतच झुलन गोस्वामी यांचा संपूर्ण प्रवास यामध्ये दाखवणार असल्याचे टीझरमध्ये दिसत आहे. हा टीझर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे; तर काही नेटकऱ्यांनी
यावरून तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी तिला ट्रोल करताना म्हणाले, ‘उंची सारखी नाही. रंग सारखा नाही. बंगाली बोलण्याची पद्धत सारखी नाही. अनुष्का या व्हिडीओत झुलन गोस्वामी सोडून सगळं दिसते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हा चित्रपट फ्लॉप ठरणार. हिच्या जागी झुलनला घेतलं असतं, तरी चाललं असतं. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अनुष्काला ट्रोल केलं आहे.
...........