मुलाखत ः अभिनेता सिद्धार्थ चांदेकर

मुलाखत ः अभिनेता सिद्धार्थ चांदेकर

मुलाखत ः अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्न आणि उत्साही सिद्धार्थ अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा ‘कॉफी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या वर्षातील प्रदर्शित होणारा त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात काय बघायला मिळणार आहे... सिद्धार्थला या चित्रपटाबद्दल काय वाटते, हे त्याच्याकडून जाणून घेऊयात. ः कॉफी या चित्रपटात तुझी भूमिका कशी असणार आहे? - या चित्रपटात समजूतदार, प्रसन्न तसेच उत्साही पण गंभीर असणारा सिद्धार्थ पाहायला मिळेल. सिनेमात मी साकारलेल्या पात्राचे नाव कश्यप आहे. तो घरंदाज, श्रीमंत घरातला, पण आईशिवाय वाढलेला असा आहे. श्रीमंती असूनही त्याचा गर्व नसलेला हा कश्यप लोकांना समजून घेताना तुम्हाला पाहायला मिळेल. या भूमिकेसाठी मला विशेष काही तयारी करावी लागली नाही. कारण सिनेमातील पात्र एकंदरीत सरळ आणि साधे असल्याने त्यात मला दाखवायचा होता तो म्हणजे साधेपणा. हा सिनेमा करण्यामागचं तुझं कारण काय? - सिनेमामध्ये माझ्यासोबत स्पृहा जोशी दिसणार आहे आणि दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. स्पृहा आणि मी गेली कित्येक वर्षे एकत्र काम करत आहोत. त्यात तिचं काम अप्रतिम असतं. आम्हाला एकमेकांसोबत काम करण्याची सवय आहे. त्यामुळे कामाचा अधिकच आनंद व हुरूप असतो. दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी आजवर नेहमीच विविधांगी, अप्रतिम चित्रपट केले आहेत. म्हणून त्यांच्यासोबत काम करताना या कॉफीचा आस्वाद घेता येईल, या कल्पनेने माझी इच्छा वाढली. अशाच प्रकारे उत्स्फूर्तपणे सिनेमाचे शुटिंग झाले. सिनेमामध्ये काय बघायला मिळणार आहे? - कॉफी जशी गोड तर कधी कडवट असते तशीच सिनेमातील कथादेखील कधी गोड आणि कडवट अशा मिश्रणात बघायला मिळेल. प्रेम जाणवल्यावर होणारी भेटण्याची आस, एकमेकांविषयी ओढ, नवनवीन प्रियकर व प्रेयसीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असं गोड प्रेम असतं. त्यासोबत गैरसमज, द्विधा मनस्थिती, वेळ नसणे अशा अनेक कडवटपणालादेखील सामोरं जावं लागत असतं. या सिनेमात असे सगळे प्रकार बघायला मिळणार आहेत. लहाणपणीच आई गेल्याने तेवढंसं प्रेम कश्यपला मिळालेलं नाही. त्यामुळे त्याला प्रेमाबाबत विशेष आतुरता आहे. काळजी घेणं, सोबत देणं अशा गोष्टी त्यालाही अनुभवायच्या आहेत आणि हे सगळं त्याला मिळतं, पण एका विवाहित स्त्रीकडून. आता अशी कॉफी तुमच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या शुटिंगदरम्यानच्या तुझ्या काही विशेष आठवणी? - चित्रपटाचं शुटिंग २०१८ मध्ये करण्यात आलं आहे. शुटिंगचं ठिकाण गोवा असल्याने नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेता आला. दिवसभराचं काम संपलं की मी आणि स्पृहा गोव्यात भाड्याने गाडी घेऊन मस्त फेरफटका मारायचो. नवनवीन पदार्थ कुठे चविष्ट मिळतात, ते पाहायचो आणि त्याचा आम्ही आस्वाद घ्यायचो. या सगळ्यात आमचे शुटिंगचे दिवस मजेत गेले. सिनेमा करायचा की नाही हे कोणत्या निकषांवर ठरवतोस? - सिनेमाचं स्क्रीप्ट वाचून झाल्यावर त्यात माझं पात्र कसं असणारं हे मी सगळ्यात आधी बघतो. त्यानंतर सिनेमात कोण कोण कलाकार आहेत हे बघितल्यावर माझं आणि त्यांचं कितपत जमेल याचा एक अंदाज येतो. चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार आहे यावर विशेष लक्ष देतो मी. कोणत्याही एकाच प्रकारचे पात्र मला साकारायला आवडेल असं नाही. त्यामुळे भूमिका निवडताना त्यामध्ये नावीन्य काय आहे ते पाहतो आणि मगच चित्रपटाला होकार देतो. सूत्रसंचालन करायला आवडतं की अभिनय करायला? - सूत्रसंचालन आणि अभिनय कोणत्याही क्षेत्राकडून मला प्रेक्षकांजवळ पोहचता येतंय हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सूत्रसंचालन करतानादेखील येणारे अनुभव वेगवेगळे असतात. सिनेमात एखाद्या पात्रासाठी जशी मेहनत घ्यावी लागते तशीच इथेदेखील सूत्रसंचालन करताना घ्यावी लागते. अभिनय करताना स्वीकारलेले पात्र उत्तमरीत्या उतरवण्यासाठी त्या पात्राचा अभ्यास केला जातो. त्यामुळे फक्त अभिनय किंवा फक्त सूत्रसंचालन अशी काही एक आवड नाही. रेवती देशपांडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com