हलव्याच्या दागिन्यांना यंदा `महागाई`चा साज

हलव्याच्या दागिन्यांना यंदा `महागाई`चा साज

हलव्याच्या दागिन्यांना यंदा महागाईचा ‘साज’ किमती आठ ते नऊ टक्क्यांनी वाढल्या पूजा पवार नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या मकर संक्रांती सणाला पूर्वी पतंग, साखरफुटाणे, तिळाचे लाडू, काळे कपडे आदींची क्रेझ होती; मात्र सणांनी व्यापक स्वरूप धारण केल्यापासून अनेक लहानसहान पद्धती यात अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. ‘हलव्याचे दागिने’ही यापैकीच एक. गेल्या काही वर्षांपासून मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने परिधान करण्याची प्रथा लोकप्रिय झाली आहे. यंदा हलव्याच्या दागिन्यांचे नवनवीन प्रकार बाजारात विक्रीसाठी असले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या दागिन्यांच्या किमतीत ८ ते ९ टक्क्यांची वाढ झाल्याचे ठाण्यातील विक्रेत्यांनी सांगितले. --------- ठाणे शहरातील जांभळी नाका येथील मुख्य बाजारपेठेत घाऊक विक्रेत्यांकडे मुख्यत्वे पुणे येथून हलव्याच्या दागिन्यांची आवक होते. काही वर्षांपूर्वी कागदी पुठ्ठ्याला चिकटवलेले हलव्याचे दागिने बाजारात उपलब्ध असायचे. मात्र मागील वर्षीपासून चिकटवलेल्या दागिन्यांपेक्षा सुबकतेने धाग्यात ओवलेल्या हलव्याचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक ओढा आहे. तसेच यंदा हलव्याच्या दागिन्यांमध्ये पारंपरिक दागिन्यांच्या डिझाईन महिलावर्गाला अधिक आकर्षित करीत आहेत. मंगळसूत्र, हार, कानातील कुड्या, बाजूबंद, मुकुट, कमरपट्टा, बांगड्या आदी दागिन्यांसह, यंदा महिलांसाठी चिंचपेटी, शाही हार, राणी हार, वेणी, बिंदी, कंबरेचा छल्ला, चपला, झुमके,मेखला, कानाच्या साखळ्या, नवनवीन डिझाईनच्या नथी अंगठ्या, पदराची माळ, बुगड्या आदी प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. मागील वर्षी कोरोना साथीमुळे राज्याबाहेरील तसेच परदेशातून येणाऱ्या हलव्याच्या दागिन्यांच्या मागणीत घट झाली होती; परंतु २०२१ च्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात असताना, नोव्हेंबर महिन्यापासूनच परदेशी आणि राज्याबाहेरील अनेक ग्राहकांना हलव्याचे दागिने पाठवण्यास सुरुवात झाली. सध्या महिलांचे हलव्याच्या दागिन्यांचे सेट २५० ते १५०० रुपयांपर्यंत असून पुरुषांच्या दागिन्यांचे सेट २०० ते १ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठीच्या दागिन्यांचे सेट हे २०० ते ७०० रुपये इतक्या किमतीत उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी टियारा सणांच्या निमित्ताने आकर्षक पेहेराव करण्यासाठी आजकाल पुरुषही मागे नसतात. तेव्हा मकर संक्रांतीनिमित्त पुरुषांसाठी हलव्याच्या दागिन्यांमध्ये मोठा हार, फुलांचा गुच्छ, नारळ, ब्रेसलेट, कुर्त्याची बटणे, कानाच्या बाल्या, पुणेरी बुगड्या, चपला, अंगठी आदी विविध नवीन प्रकार उपलब्ध आहेत. मकर संक्रांतीनिमित्त लहान मुलांनाही हलव्याच्या दागिन्यांनी सजवण्याची परंपरा आहे. यंदा लहान मुलींसाठी टियारा’ हा नवीन प्रकारही उपलब्ध झाला आहे. तसेच राधाकृष्णाचे सेट, मुकुट, बासरी, बाजूबंद, कमरपट्टा, माळ आदी दागिने मुला-मुलींसाठी उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हलव्याचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. डिसेंबर महिन्यापासूनच परदेशातील ऑर्डर्सची पूर्तता करण्यास सुरुवात झाली. यंदा अमेरिकेसह भारतातील हैदराबाद, दिल्ली येथे मी स्वतः तयार केलेले हलव्याचे दागिने पाठवले आहेत. - मनीषा ओझरकर, विक्रेत्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन टाळेबंदी होईल, या भीतीने अनेक जण मकर संक्रांतीच्या आठवडाभर आधीपासूनच हलव्याचे दागिने तसेच इतर वस्तूंच्या खरेदीसाठी येत आहेत. हलव्याचे दागिने परिधान करण्याची लोकप्रियता वाढत असल्याने यंदा यात अनेक वेगळ्या डिझाईन्स उपलब्ध झाल्या आहेत. - स्वप्नील तंटक, घाऊक विक्रेते लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांत सणाला हलव्याचे दागिने घालून, पती आणि कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्यात एक वेगळाच आनंद आहे. त्यामुळे परंपरा जपत सण साजरा करण्यासाठी हलव्याच्या दागिन्यांची खरेदी करीत आहोत. - सान्वी मोहिते, ग्राहक दागिन्यांचे दर दागिने आधीचे दर आताचे दर महिलांचे सेट २०० पासून पुढे २५० पासून पुढे पुरुषांचे सेट १५० पासून पुढे २०० पासून पुढे लहान मुलांचे सेट १५० पासून पुढे २०० पासून पुढे इतर दागिने आधीचे दर आताचे दर ानारळ ७५ १०० पुरुष हार १२० १५० मंगळसूत्र ८० १०० शाही हार २५० ३०० कानातले ४० ५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com