झांझरोळी येथील धरणाला भगदाड
प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पालघर, ता. ८ (बातमीदार) ः झांझरोळी येथील माहीम - केळवा लघु पाटबंधारे धरणाच्या मुख्य पाणी सोडण्याच्या भिंतीच्या बाजूस भगदाड पडले आहे. त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू झाली आहे. हे धरण झांझरोली गावाच्या वरील बाजूस असल्याने धरणाच्या खालील गावांना जिल्हा प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाण्याची गळती ही गंभीर बाब असून यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर लगेच गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गळती वाढल्यामुळे आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. हे भगदाड बुजवण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत धरणातील पाण्याचा उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
धरणाला गळती लागल्यामुळे भविष्यात धरण फुटल्यास पाच ते सहा पाडे पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांचे स्थलांतर केले जाईल असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात असून जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. अंधेरीहून हे पथक पालघरसाठी रवाना झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, पाटबंधारे घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळी तैनात असणाऱ्या यंत्रणांना वेळोवेळी संपर्कात राहून तेथून माहिती घेतली जात आहे.
धरण सुरक्षा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ४ जानेवारी रोजी माहीम-केळवा योजनेची क्षेत्रीय पाहणी केली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाला धरणाचा पाणीसाठा हळूहळू कमी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. झांझरोळी धरणाच्या बाहेरच्या बाजूला १७५ ते १८९ मीटर धरणाच्या मधून पावसाळ्यात काही प्रमाणात गळती होत होती. गळती रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात अशा सूचना स्थानिक पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या होत्या. तसेच धरणाचा पाणीसाठा कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याचे पाटबंधारे विभागाला सूचित करण्यात आले होते.