बोर्डी परिसरात हलका पाऊस
बोर्डी, ता. ८ (बातमीदार)ः बोर्डी परिसरात शनिवारी (ता. ८) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. शनिवारच्या आठवडे बाजारात या पावसामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली. खास करून धान्य आणि कडधान्य विक्रेत्यांना त्याचा मोठा फटका बसला. मागच्या काही दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण आहे. असंतुलित वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
शनिवारी सकाळी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी आभाळ काळेकुट्ट झाले होते. १५-२० मिनिटांतच पाऊस थांबल्यानंतर १० वाजण्याच्या सुमारास सूर्यदर्शन झाले. तरी ढगाच्या आडून सूर्याचा लपंडाव सुरूच होता. एकूणच वातावरणाचा फटका येथील शेती बागायतीला बसणार आहे, असे महाराष्ट्र राज्य कृषी सल्लागार समितीचे सदस्य कृषिभूषण शेतकरी यज्ञेश सावे यांनी सांगितले.