प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या
शर्टावरील टेलर मार्कमुळे गुन्हा उघडकीस
भिवंडी, ता. ८ (बातमीदार) ः महिलेने प्रेमाच्या आड येत असलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. गावठी औषध घेण्याच्या उद्देशाने खारबाव गावच्या जंगलात नेऊन त्याची हत्या करण्यात आली. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला होता; मात्र पोलिसांनी मृतदेहाच्या अंगातील शर्टावरील मार्कच्या आधारे तपास करीत मृतदेहाची ओळख पटवली. हत्या करणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकरास मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
सलाउद्दीन मोहम्मद युसूफ (वय ४२) असे मयताचे नाव आहे. भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचा हद्दीत ४ जानेवारी रोजी खारबाव जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या व चेहरा विद्रूप केलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांना मृतदेहाच्या शर्टावरील आयान फॉर मेन्स टेलर्स हा मार्क आढळून आला. त्यावरून पोलिसांनी भिवंडीत या नावाच्या टेलर्स दुकानाचा शोध घेतला असता शहरातील बागे फिरदोस येथे हे दुकान आढळून आले. त्यानंतर दुकानदाराच्या मदतीने शर्टाची व त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. तेव्हा तो मृतदेह सलाउद्दीन मोहम्मद युसूफ याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाच्या कुटुंबीयांचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांनाकडून गोपनीय माहिती घेतली असता त्याच इमारतीमधील असजद अन्सारी ही व्यक्ती दफनविधीप्रसंगी नव्हती ही बाब समोर आली. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे वळली. त्याचा शोध घेत त्याला नारपोली परिसरातून ताब्यात घेत पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने हत्येची कबुली दिली.
--------------------
चौकट
असजद अन्सारी (वय ३२) या विवाहित व्यक्तीचे मयत व्यक्तीच्या ३८ वर्षीय पत्नीसोबत मागील सहा महिन्यांपासून संबंध होते. त्यामध्ये पतीचा अडसर ठरत असल्याने पत्नी व प्रियकराने मिळून पतीला मारण्याचा कट रचला. मयत पती यास लघवीचा त्रास होत असल्याने खारबाव येथील ग्रामीण भागात त्यावर गावठी औषध मिळते ते घेण्यासाठी त्यास पत्नीने गळ घातली व तेथे घेऊन गेली. दोघे तेथे गेले असता त्या ठिकाणी आधीच येऊन थांबलेल्या प्रियकराने धारदार शस्त्राने सलाउद्दीनचा गळा चिरून हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी तोंडावर दगड आपटून चेहरा विद्रूप केला व पळून गेले.