विमानतळ नामकरणासाठी पुन्हा भूमिपुत्रांची गर्जना
१३ जानेवारीला ‘भूमिपुत्र परिषद’; तर २४ जानेवारीला विमानतळ ‘काम बंद'' आंदोलन
पनवेल, ता. ९ (प्रतिनिधी) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी दिबांच्या जयंतीचे औचित्य साधून १३ जानेवारीला रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांची ''भूमिपुत्र परिषद''; तर २४ जानेवारीला विमानतळ ‘काम बंद'' आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी दिली. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याची गर्जना या वेळी उपस्थित नेत्यांनी केली.
कृती समितीचे उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेस माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह नवी मुंबई, पनवेल, उरण, मुंबई, ठाणे, कल्याण आदी विभागांतील प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या सर्व संघटना प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे अस्तित्व जपण्याचे काम करीत आहेत. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना काम देणे, ही जबाबदारी सरकारची आहे. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच विमानतळाला दिबांचे नाव दिलेच पाहिजे, ही भूमिपुत्रांची आग्रही आणि रास्त मागणी आहे. गतवर्षी १० जून, २४ जून आणि ९ ऑगस्टच्या आंदोलनानिमित्त लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने सारा भूमिपुत्र समाज एकवटला. आता दिबांच्या जन्मदिनी, १३ जानेवारीला भूमिपुत्र परिषद, कोल्ही कोपरगाव, दत्त मंदिराजवळ (ता. पनवेल) विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद म्हणजे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या अस्मितेची, अस्तित्वाची आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देणारी आहे.
राज्य सरकार भूमिपुत्रांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करत आहे. सिडकोचा ठराव रद्द करून नव्याने दिबांच्या नावाचा ठराव करून राज्य सरकारला द्यावा आणि तो प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावा, ही आग्रही मागणी सातत्याने भूमिपुत्रांकडून होत असतानाही त्याकडे सिडको व ठाकरे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे २४ जानेवारीला विमानतळाचे सुरू असलेले सर्व काम बंद पाडण्यात येणार आहे.
- रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष, विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती.