पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची नर्सला धक्काबुक्की
घणसोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : ॲन्टिजेन तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर दोन व्यक्तींनी रागाच्याभरात कोरोना तपासणी करणाऱ्या नर्सला धक्काबुक्की करून तिचा हात मुरगळल्याची घटना घणसोली नोसिल नाका येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. हिम बहादूर रोखा (३५) आणि सिकंदर सोहेल निषाद (३५) अशी दोघांची नावे असून रबाळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हिम बहादूर आणि सिकंदर निषाद हे दोन्ही घणसोलीतील नोसिल नाका परिसरात राहत असून ६ जानेवारी रोजी ते महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणीसाठी गेले होते. आरोग्य केंद्रातील संगीता कनोजिया या नर्सने दोघांची ॲन्टीजेन तपासणी करून त्यांना अहवाल येईपर्यंत बसण्यास सांगितले. थोड्या वेळानंतर या दोघांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नर्स संगीता कनोजिया हिने दोघांना त्याबाबतची माहिती देऊन पुढील उपचाराबाबत सूचना दिल्या. या गोष्टीचा राग आल्याने, दोघांनी नर्स संगीता कानौजिया सोबत हुज्जत घालून तिचा हात मुरगळला. तसेच तिला धक्का मारून शिवीगाळ करून पळ काढला.
कनौजिया यांनी घटलेल्या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याला दिली. त्यांनतर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दोघांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी फोन घेतले नाही. कानौजिया यांनी वरिष्ठ अधिकऱ्यांसोबत चर्चा करून रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हिम बहादूर आणि सिकंदर निषाद या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.