दहा टक्के आरोग्य कर्मचारी बाधित
डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सहायकांना लागण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : नवी मुंबई शहरात कोविडच्या नव्या रुग्णांचा उद्रेक झाला आहे. कोविड रुग्णांच्या चाचण्या आणि त्यांच्यावर उपचार करताना महापालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल दहा टक्क्यांपेक्षा जास्त डॉक्टर आणि कर्मचारी कोविडबाधित झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांना याला दुजोरा दिला आहे.
नवी मुंबई शहरात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोजच्या रोज रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. रुग्ण वाढीचा वेग पाहता शहरातील खासगी कोविड रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये, कोविड केअर केंद्रातील खाटा पुन्हा भरू लागल्या आहेत. महापालिकेतर्फे नागरी आरोग्य केंद्रे, महापालिकेची रुग्णालये, रेल्वे स्थानके आदी ठिकाणी कोविड चाचण्या केल्या जात आहेत. महापालिकेच्या १८ कोविड केअर केंद्र आणि विलगीकरण केंद्र पुन्हा एकदा आयुक्तांच्या आदेशाने खुले करण्यात आले आहे.
कोविड चाचण्या करण्यासाठी केंद्रावर नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसतात. नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे येथे कर्तव्यावर असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविडची लागण होत आहे. महापालिकेच्या बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील सर्वच रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, रुग्ण सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी बरेचसे कर्मचारी बाधित असल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण होत आहे.
नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात चाचणी केंद्रांवर मनुष्यबळाअभावी दुपारी आलेल्या कर्मचाऱ्यांना रात्रभर चाचण्यांचे काम करावे लागते. ऐरोलीतील महापालिका रुग्णालयातील तब्बल ४० डॉक्टर, नर्स, ब्रदर्स कोविडने बाधित असल्याचे आरोग्य विभागात बोलले जात आहे. तुर्भे नागरी आरोग्य केंद्रातील ५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे समजते. महापालिकेच्या वर्दळ असणाऱ्या बहुतांश नागरी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयातील कर्मचारी बाधित झाले आहेत. डॉक्टर, परिचारिका, ब्रदर्स, बेड साईट असिस्टंट, कक्ष सेवक, आशा वर्कर बाधित झाल्या आहेत.
---------
सुट्ट्या रद्द
आरोग्य विभागातील कोविड बाधित कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचे उपचार करून पुन्हा कामावर बोलावले जात आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी रजेवर गेले आहेत, त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
-----------------------------------
आता सर्वच रुग्ण ओमिक्रॉनबाधित?
राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णाचा शिरकाव झाल्यानंतर महापालिकेने कोविड बाधित रुग्णांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवून ते ओमिक्रॉनची पडताळणी केली जात होती. परंतु त्याच्या अहवाल येण्यास होणारा उशीर आणि त्यावर होणारा खर्च पाहता, ती चाचणी महापालिकेने बंद केली आहे. आता बाधित होणारे सर्व रुग्णांना सरसकट ओमिक्रॉनबाधित समजून उपचार केले जात आहेत.