रोहा अष्टमी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार

रोहा अष्टमी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार

रोहा अष्टमी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची सिटीझन फोरमला ग्वाही रोहा, ता. ९ (बातमीदार) : रोहा अष्टमी शहरावर नुकतीच सहा दिवस पाणीबाणी ओढवली. रोहेकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. त्यानंतर अद्यापही नागरिकांना कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. यासाठी रोहा तालुका सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. ६) नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची भेट घेऊन पाणी संकटाला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली. या वेळी शहराचा पाणीपुरवठा तीन ते चार दिवसांत सुरळीत होईल, अशी माहिती मुख्याधिकारी गोरे यांनी दिली. रोहा अष्टमी शहरासाठी १३.५ कोटी रुपये खर्चाची नवीन वाढीव नळपाणी योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेतील पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे काम चुकीचे, नियोजनशून्य व दर्जाहीन करण्यात आल्याने त्यामध्ये वारंवार बिघाड होत असत. तांत्रिक दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा महिन्यातून दोन दिवस बंद ठेवण्यात येत असतो. गेल्या महिन्यात तर सहा दिवस पाणीबाणी ओढवली होती. परिणामी, पाण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागले. शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला असला, तरी कमी प्रमाणात नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे. यासाठी रोहा तालुका सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी अध्यक्ष नितीन परब, ॲड. मनोजकुमार शिंदे, निमंत्रक आप्पा देशमुख, ज्येष्ठ उस्मानभाई रोहेकर, माजी नगरसेवक महेश सरदार, राजेश काफरे, प्रशांत देशमुख, मिलिंद अष्टीवकर आदी उपस्थित होते. या चर्चेदरम्यान नागरिकांना लवकरात लवकर मुबलक पाणी मिळावे आणि नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी फोरमतर्फे करण्यात आली. पाणीपुरवठा योजनेतून टाकलेली नवीन जलवाहिनी झिगझॅग आहे. वाहिनीवरील प्रेशर रिलीफ व्हॉल्व रोहा-कोलाड रस्त्यावर साईडपट्टीवर घेतले आहेत. रस्त्याच्या साईडपट्टीवर काम करण्याचे सल्लागार संस्था निसर्ग कन्सल्टंट यांनी चुकीचे सुचविलेले आहे. खोदाई तसेच विविध कामे त्या ठिकाणी झाल्यास पाणी समस्या उद्भवू शकते. सद्यस्थितीत जलवाहिनी झिगझॅग असलेल्या ठिकाणी सतत फुटत आहे. यासाठी ठेकेदाराच्या निकृष्ट कामासोबतच वर्किंग सर्व्हे व प्रोजेक्ट रिपोर्ट करणारी निसर्ग संस्था जबाबदार आहे. त्यांच्यावर तातडीने सक्त कारवाई व्हावी, अशी मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. तसेच या कामासाठी खर्च झालेल्या रकमेचा भुर्दंड कोण सोसणार आहे. थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या संस्थेने प्रत्यक्ष ठिकाणी साईट व्हिजिट केलेली नाही. त्यांच्या साईट व्हिजिट केल्याची नोंद तपासून कारवाई करण्यात यावी, असेही सांगण्यात आले. -------------------------------------------------------------------------- कुंडलिका नदीचे संवर्धन आवश्‍यक एमआयडीसी आणि बिर्ला कंपनीच्या जुन्या जलवाहिन्या फुटत नाहीत आणि नगरपालिकेने केलेल्या जलवाहिनींची कामे कशी वारंवार नादुरुस्त होतात. पाणी संकट लक्षात घेऊन नागरिकांना कुंडलिका नदीवरून पाणी आणता यावे, यासाठी नदी संवर्धनात बंद केलेले रोहा व अष्टमी बाजूकडील रस्ते वाहनांसाठी पुन्हा तयार करण्यात यावेत. रोहा अष्टमी शहरातील सर्व गटारांतील सांडपाणी नदीच्या पात्रात सोडले जात आहे. त्याने नदीचे संवर्धन कसे होणार, नदीचे पाणी खराब होऊ नये यासाठी हे सांडपाणी शहराबाहेर सोडण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी या मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. ---------------------------------------------------------------------------- वाढीव नळपाणी योजना, भुयारी गटार योजना, कारीवणे पाणी योजना आदींच्या सल्लागार संस्था असलेल्या मे. निसर्ग एजन्सीने या कामांचे चुकीचे नियोजन करून पालिकेकडून कोट्यवधींची बिले घेतली आहेत. या संस्थेला काळ्या यादीत टाकून त्यांनी केलेल्या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावेत. - नितीन परब, अध्यक्ष, रोहा सिटीझन फोरम फोटो ओळ : रोहा नगरपालिका मुख्याधिकारी गोरे यांच्याशी चर्चा करताना सिटीझन फोरमचे पदाधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com