मानखुर्दच्या मतिमंद बालगृहाला राजकारणाचे ग्रहण

मानखुर्दच्या मतिमंद बालगृहाला राजकारणाचे ग्रहण

मानखुर्दच्या मतिमंद बालगृहाला राजकारणाचे ग्रहण विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी चोरून बनवलेला व्हिडीओ व्हायरल रशीद इनामदार : सकाळ वृत्तसेवा मानखुर्द, ता. ९ : मानखुर्दच्या मतिमंद बालगृहात मुलांची काळजी घेण्यास प्राधान्य देण्याऐवजी काही कर्मचाऱ्यांना कुरघोडी करण्यात अधिक रस असल्याची बाब समोर आली आहे. संस्थेतील मुलांचे चोरून व्हिडीओ बनवून त्यासोबत चुकीची माहिती समाज माध्यमातून प्रसारित केली जाते. त्यामुळे संस्थेची प्रतिमा मलीन होतच आहे, पण सोबत मतिमंद मुलांचे भवितव्य घडवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. बालगृहातील एका मुलाला मार्च महिन्यात जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्या वेळी त्याची काळजी घेण्यासाठी मोठ्या मुलांना सोबत थांबवण्यात येत होते. तेव्हा रुग्णालयातील त्या वॉर्डमधील दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाचा मोबाईल चोरी झाला होता. त्या नातेवाईकाने तो मोबाईल काळजीवाहक म्हणून नेमलेल्या बालगृहातील मुलाने चोरल्याचा आरोप केला. त्या अनुषंगाने बालगृहातील कर्मचाऱ्यांनी त्या मुलाची तसेच त्याच्या लॉकरची झडती घेतल्यावर चोरलेला मोबाईल सापडला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी एका मुलाच्या लॉकरची तपासणी केली असता आणखी साहित्य सापडले. एकूण ५ मोबाईल, हेडफोन, चार्जर तसेच टीव्हीचे रिमोट मिळाले होते. आरोप करणाऱ्या नातेवाईकाला त्याचा मोबाईल परत करण्यात आला होता. या प्रकरणावरून सूडभावनेतून बालगृहातील काही अधिकाऱ्यांनी मुलांना मारहाण व विनयभंग होत असल्याचा कांगावा करण्यास सुरुवात केली. बालगृह परिसरात छायाचित्र तसेच चित्रफीत काढण्यास मनाई आहे, असे असतानादेखील मुलांना आरोप करण्यास चिथावून त्यांच्या चित्रफिती काढण्यात आल्या व नंतर त्या समाज माध्यमातून व्हायरल करण्यात आल्या. याविषयी ट्रॉम्बे पोलिसांनी तसेच संबंधित विभागाच्या वरिष्ठांनीदेखील चौकशी केली होती. त्याचा अहवाल संस्थेच्या वतीने संबंधित विभागांकडे सादर करण्यात आला, परंतु त्यानंतर संस्थेतील कर्मचारी व संस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. शुक्रवारी (ता. ७) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चिल्ड्रेन्स एड सोसायटीचे पथक आले होते. त्या वेळी संस्थेच्या सध्याच्या अधीक्षक उपस्थित होत्या; मात्र पायउतार झालेले प्रभारी अधीक्षक उपस्थित नव्हते. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत समाज कल्याण विभागाने त्या अधिकाऱ्याची विरार येथील बालगृहात बदली केली आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. ती समिती चौकशी करत आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सत्य समोर येईल. - सतीश बनसोडे, उपमुख्याधिकारी, चिल्ड्रेन्स एड सोसायटी. बाल कल्याण समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्या मुलांशी याविषयी संवाद साधण्यात आला; मात्र असे काहीही घडल्याचे निष्पन्न झालेले नाही. - शंकर जाधव, अध्यक्ष, बाल कल्याण समिती अशा प्रकारे मुलांचे भवितव्य टांगणीला लावणे चूक आहे. समाजमाध्यमाचा चुकीच्या पद्धतीने होत असलेला वापर विध्वंसक ठरू शकतो. समाजमाध्यमे हाताळताना सामाजिक जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. - राजेश निचिते, उपाध्यक्ष, दि चिल्ड्रेन्स एड सोसायटी एम्प्लॉईज युनियन. असा कोणताही गैरप्रकार संस्थेत घडलेला नाही. त्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही. - डॉ. जयेश वसुले, वैद्यकीय अधिकारी, मतिमंद बालगृह, मानखुर्द.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com