‘सन्मान लेकींचा’ कार्यक्रम ऑनलाईन
मुंबई, ता. ९ :
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंतीपर्यंत राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान चालविण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान राज्यातील शाळा या ऑनलाईन सुरू झाल्याने या अभियानाच्या अनेक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. यासाठी आता या अभियानाच्या अंतर्गत असलेले सर्व कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविले जात आहेत, मात्र कोरोनाच्या अडचणीमुळे शाळा बंद असल्याने अनेक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. याविषयी शिक्षण विभागाने कार्यक्रमात सुसूत्रता यावी, म्हणून शाळांना या दरम्यानचे कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश दिले आहेत. १२ जानेवारीपर्यंत हे अभियान चालणार असून या अभियानाची माहिती सादर करण्यासाठी शाळांना शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.