शरद पवारांच्या उपस्थितीत
एसटीच्या कृती समितीची बैठक
आज संपावर तोडगा निघण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : २७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अजूनही काही एसटी कर्मचारी संपातून माघार घ्यायला तयार नाहीत. संपाची नोटीस दिलेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाशिवाय माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने अद्याप एसटीची सार्वजनिक सेवा सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे सोमवारी (ता. १०) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप नेतृत्वहीन असल्याने राज्य सरकारने चर्चा तरी कोणाशी करायची, असा पेच निर्माण झाला आहे. यापूर्वी कृती समितीशी चर्चा करून घरभाडे, महागाई भत्त्याची वाढ देण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून वेतनवाढ देण्यात आली, तर संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्याशी चर्चा करून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतरही एसटी कर्मचारी मात्र, अद्याप संपावर कायम आहेत.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी होणाऱ्या बैठकीला महत्त्व निर्माण झाले आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी जरी विलीनीकरणाची मागणी केली असली तरी त्यापैकी ५० टक्के कर्मचारी वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढल्यास संपातून माघार घेण्यास तयार आहेत. त्यामुळे सर्व पर्यायांवर या बैठकीत चर्चा करून तोडगा निघण्याची शक्यता आहे.