दिघा येथे एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण
पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवासी संतप्त
वाशी, ता. ९ (बातमीदार) : दिघा येथील बिदुमाधव नगर व दफनभूमीच्या मागील मोकळ्या भूखंडावर भूमाफियांकडून अनधिकृत चाळी बांधण्यात येत आहेत. या चाळी बांधून गरजवंतांना विकून त्यांची फसवूणक करण्यात येत आहे. लाखो रुपयांना या चाळीमधील रूम विकण्यात येत आहेत. चार महिन्यांपासून ही बांधकामे सुरू आहे; पण प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
दिघा येथील उच्च न्यायालयाने ९९ अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामधील पाच इमारती या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिघामध्ये एकही इमारत पुन्हा उभी राहू शकली नाही. त्यामुळे आता राजकीय नेत्यांच्या वरदहस्तांमुळे एमआयडीसीचे मोकळे भूखंड लाटण्याचे प्रकार सुरू आहेत. या मोकळ्या भूखंडांवर चाळी बांधून त्या गरजवंतांना विकण्यात येत आहेत. दिघा येथे प्रस्ताविक रेल्वेस्थानकांचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील झोपड्यांचा भावही वधारला आहे. परिणामी, मोकळ्या भूखंडावरील जागेलाही भाव आला आहे. त्याच जागेवर चाळी बांधून विकण्यात येत असल्यामुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाचेही यामध्ये आर्थिक लागेबांधे असल्यामुळे त्यांनीही याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेचे विभाग अधिकारी मनोहर गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याची पाहणी केली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- एस. एम. गित्ते, एमआयडीसी